सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 10:10 PM2021-12-29T22:10:49+5:302021-12-29T22:11:22+5:30
सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आंगरीलाच ओंब्यालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे.
सुरगाणा : तालुक्यात तीन दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस झाल्याने भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी खळ्यात रचून ठेवलेली भाताची गंजी अवकाळी पावसाच्या पाण्यात भिजली आहे. तर शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने शेतातच भाताच्या आंगरीलाच ओंब्यालाच कोंब फुटले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे.
अवकाळी पावसाने तालुक्यात सर्वच भागात भात शेतीसह नागली, वरई व हरभरा, मसूर, ज्वारी, मोंढ्या कोरडवाहू गहू, सुरगाणा तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अजूनही पावसाचे सावट कायम असून पावसाची संततधार सुरूच आहे . शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक मातीत जात असल्याने बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट ओढावले आहे. बागायत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बहरलेला शेतीमाल वाया जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या बेमोसमी पावसाने घाट माथ्यावर स्ट्रॉबेरीचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
यावर्षी देखील भात पिकाचे पुराच्या पाण्याने झालेले नुकसान, खतांचा तुटवडा व मावा, करपा, बुरशी तुडतुडा, टाका या रोगांमुळे झालेले नुकसान व यातून कसेबसे सावरून भात उत्पादक बळीराजाची धडपड सुरू असताना बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने हातात आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.
बँकां, सहकारी संस्था, फायनान्सचे व सावकारी तसेच हात उसनवारीने घेतलेले कर्ज शेतकरी कसे फेडणार ? मुला-मुलींचे लग्न, शिक्षण व इतर मूलभूत गरजा कशा भागविणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भात उत्पादक शेतकऱ्यांचे महसूल विभाग व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. भात, नागली, वरई, उडीद, कुळीथ तसेच इतर पिकांची खूप नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील हरभरा, कांदा रोपे, गहू ही पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
माणी येथील शेतकरी भांडू पवार, वसंत पवार यांनी शेतात कापून ठेवलेला भात पूर्णपणे भिजल्याने खराब झाला आहे. तसेच पिंपळ सोंड येथील रामदास गावित यांच्या शेतात भाताची कापणी करुन ठेवलेला भात भिजून पाण्यात तरंगत आहे. भात शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.