जिल्ह्यात वादळी पावसाने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:17 PM2020-06-05T22:17:00+5:302020-06-06T00:07:50+5:30
मालेगाव शहरासह तालुक्यात निसर्ग वादळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने तळी साचली. शहरात अनेक ठिकाणी वादळाने झाडे पडली; मात्र सुदैवाने कोणतीही वित्तहानी झाली नाही. तालुक्यात कांदा पीक पावसात भिजून नुकसान झाले.
मालेगाव : शहरासह तालुक्यात निसर्ग वादळाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, तर शहरात ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने तळी साचली. शहरात अनेक ठिकाणी वादळाने झाडे पडली; मात्र सुदैवाने कोणतीही वित्तहानी झाली नाही. तालुक्यात कांदा पीक पावसात भिजून नुकसान झाले.
बुधवारी शहरात महापालिका आयुक्त दीपक कासार आणि महापौर ताहेरा शेख यांनी वादळाच्या पार्श्वभूमीवर तातडीने आढावा बैठक घेऊन अधिकारी कर्मचारी यांना कामाच्या जबाबदाºया सोपवून नियोजन केले होते. त्यामुळे तातडीने कर्मचाºयांनी रात्रभर मोहीम राबवून तुंबलेले पाणी काढण्यास मदत केली तर घाण कचरा अडकल्याने नाल्यातून पाणी वाहत नसल्याने अग्निशमन विभागाच्या जवानांनी रात्रीच धाव घेऊन नाल्यातील घाण काढल्याने पावसाचे साचलेले पाणी वाहून गेले. त्यामुळे जलमय झालेले रस्ते पाणी वाहून गेल्याने पुन्हा मोकळे झाले. मालेगाव शहरात सलीम चाचा रोडवर रात्री वादळात निंबाचे झाड पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रीच धाव घेत कटरने झाडाच्या फांद्या कापून रस्ता रहदारीस मोकळा केला. शहरातील शीतला माता नगरात ११ हजार केव्ही लाइनवर झाड पडल्याने कॅम्प परिसरात अंधार पसरला होता. रात्रीच अग्निशमन दलाचे विभागप्रमुख संजय पवार व त्यांच्या कर्मचाºयांनी झाड बाजूला केल्याने रात्री उशिरा विद्युतपुरवठा सुरू झाला. शहरात दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. इकबालडाबी भागातही वादळाने झाड कोसळले होते. शहरात जैतून हज्जीन मशिदीजवळ पावसाचे पाणी भरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी नाला मोकळा केल्याने पाणी वाहून गेले. नूरबाग बागेत पहाटे ४ वाजेच्या सुमारास घरास आग लागली होती. वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविल्याने मोठे आर्थिक नुकसान टळले.
मालेगाव तालुक्यातील कजवाडे येथे वादळी पावसात पॉलिहाउस जमीनदोस्त झाल्याने शेतकºयांचे लाखोंचे नुकसान झाले. तालुक्यातील टोकडे येथे मोठा पाऊस झाला. वादळाने परिसरातील शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले तर भगवान द्यानद्यान या शेतकºयाच्या शेतात रोहित्र पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. कळवाडीत झाडे उन्मळून पडली तर शेतकºयांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या भाजीपाला वादळी पावसात भिजल्याने मोठे नुकसान होऊन शेतकºयांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
नांदूरवैद्य परिसरात विजेचे खांब आडवे
नांदूरवैद्य : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाने घातलेल्या थैमानामुळे इगतपुरी तालुक्याच्या पूर्वभागात असलेल्या नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे, नांदगाव बुद्रुक, अस्वली स्टेशन, गोंदे दुमाला आदी परिसरात अनेक घरांसह विजेचे खांब व वीजवाहिन्या कोसळल्या. यामुळे परिसर काही तास अंधारातच असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
निसर्ग चक्रीवादळाचा मार्ग नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीहून जाणार असल्याने प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व ठिकाणी दुकाने, भाजीपाला मार्केट तसेच इतर सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. तसेच विद्युतपुरवठाही बंद करण्यात आला होता. वातावरणात बदल झाल्याने जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर वादळी वाºयासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाने जोर धरल्यामुळे नांदूरवैद्य-अस्वली रस्त्यावरील विजेचे दोन खांब पडले असून, एक खांब वाकल्यामुळे विद्युत वाहिन्या तुटल्यामुळे काही तास परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे परिसरातील अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असून, घरांवरील पत्रे उडाल्यामुळे नुकसान झाले आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर धोका निर्माण होणार नाही यासाठी पाडळी देशमुख येथील सरपंच खंडेराव धांडे यांनी झोपडपट्टीतील कुटुंबाला गावातील मारुती मंदिराजवळ असलेल्या सभागृहात राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली.
इगतपुरी तालुक्यातील मालुंजे गावातील काही घरांवरील पत्रे उडाल्यामुळे येथेही वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
मालेगाव शहरासह तालुक्यात गुरुवारी (दि. ३) रात्री एकूण सरासरी ७३.४० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. त्यात मालेगाव- ७२ मिमी, दाभाडी-७१ मिमी, वडनेर -६५ मिमी, करंजगव्हाण ६५ मिमी, झोडगे-७९ मिमी, कळवाडी-७४ मिमी, कौळाणे-८२ मिमी, सौंदाणे-७२ मिमी, सायने-६७, निमगाव-७२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद तालुक्यात कौळाणेत झाली. तालुक्यात सरासरी ७१.९० तर एकूण सरासरी ७३.४० टक्के पावसाची नोंद झाली.