क्रशर, ब्लास्टिंगमुळे शेतपिकांची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 02:53 PM2021-05-20T14:53:00+5:302021-05-20T14:53:09+5:30
सिन्नर: समृद्धी महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, क्रशरसह मिक्सर मशीन, सिमेंट प्लांट तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ...
सिन्नर: समृद्धी महामार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, क्रशरसह मिक्सर मशीन, सिमेंट प्लांट तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील बागायतदार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली असून, गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन राहिलेले नाही. तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांनी गेल्या दोन वर्षांपासून पंचनामे करूनही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ठाणेस्थित कार्यालयापासून नाशिकच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहे. समृद्धी महामार्गाचे व्यवस्थापक राधेश्याम मोपलवार यांनाही वैयक्तिक मेसेज पाठवून प्रकरणांची माहिती दिली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनाही सर्व कागदपत्रांची माहिती त्यांचे स्वीय सहायक यांच्यामार्फत सादर केली आहेत. तरीही अजून कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही. रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता नाशिक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना योग्य ती कार्यवाही होईल, असे आश्वासन देऊन बोळवणी केली जात आहे.
--------------
चारा पिकांवर धूळ
शेती पिकांबरोबरच जनावरांसाठी चारा उत्पादन थांबले आहे. चारा पिकांवरही धूळ, सिमेंटने विपरीत परिणाम केला असून, दुभत्या गाई-म्हशींना बाधा होऊ लागली आहे. त्यामुळे शेतीला जोडधंदा असलेला दुग्ध व्यवसायही बाधित झाला आहे. त्यामुळे जगायचे तरी कसे, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे. लवकरात लवकर संबंधित विभागाने पंचनाम्याच्या ठरलेल्या मोबदल्याप्रमाणे योग्य नुकसान भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे; अन्यथा लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही येथील नामदेव वाघ यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
---------------------
फळबागांसह शेतमालाचे नुकसान
गेल्या दोन वर्षांपासून सीताफळ, पेरू, आंब्याच्या बागा, टोमॅटो, कांदा, काकडी, वांगे तसेच इतर कडधान्य पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. तसेच ब्लास्टिंगमुळे शेजारील घरांचेही अतोनात नुकसान झाले आहे. याची जाणीव कंपनी अधिकाऱ्यांनाही असून, त्यांनी तसेच एमएसआरडीसीनेही पाहणी केलेली आहे. तसेच आजी-माजी लोकप्रतिनिधींनाही या गोष्टीची माहिती दिलेली आहे, त्यांनी या विषयाकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. आज अशा कोरोना महामारीच्या काळात शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.