जानेवारीपासून शहरवासीयांना मुकणे धरणाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:38 AM2018-10-09T01:38:19+5:302018-10-09T01:38:59+5:30
शहरातील सिडको आणि पाथर्डीसह अन्य भागाला वरदान ठरू शकणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनीचे काम करण्याच्या कामाला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, त्यामुळे आता १ जानेवारीपासून शहराला अतिरिक्त १३७ दशलक्ष लिटर्सचा पाणीपुरवठा होणार आहे.
नाशिक : शहरातील सिडको आणि पाथर्डीसह अन्य भागाला वरदान ठरू शकणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनीचे काम करण्याच्या कामाला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, त्यामुळे आता १ जानेवारीपासून शहराला अतिरिक्त १३७ दशलक्ष लिटर्सचा पाणीपुरवठा होणार आहे. नाशिक शहराला सध्या गंगापूर धरण आणि चेहेडी बंधारा येथून पाणीपुरवठा केला जातो. सुमारे साडेचारशे दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा शहरासाठी केला जात असला तरी वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भविष्यात शहराला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे महापालिकेने कॉँग्रेस सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेचा प्रस्ताव मांडला होता. सदरचा प्रस्ताव अखेरच्या टप्प्यात सादर झाला आणि त्यानंतर तो केंद्र शासनाने मंजूरदेखील केला. या कामासाठी २२० कोटी रुपयांच्या निविदा मागवण्यात आल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात ज्यादा दराची निविदा मंजूर झाल्याने हे काम सुमारे २६५ कोटी रुपयांवर गेले आहे.
सदरचे काम प्रगतिपथावर असून, त्यानुसार मुकणे धरणातील जॅकवेल (जलविहीर)चे काम ७६ टक्के पूर्ण झाले आहे. धरणात पाणी असल्याने हे काम पूर्ण करण्यात व्यत्यय येत आहे. पाइपलाइन आणि अन्य कामे ९० टक्के तर संपूर्ण योजनेचे सरासरी काम ८६ टक्के इतके पूर्ण झाले आहे. या कामाची अंतिम मुदत जुलै अखेरपर्यंत होती, मात्र कामाला विलंब झाल्याने त्यातील अनेक कामे पूर्ण न झाल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डिसेंबरअखेरपर्यंत डेडलाईन दिली असून इतक्या वेळेत हे काम पूर्ण होणार असल्याने आता शहराला जानेवारी महिन्यापासून १३७ दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे.
‘येथील’ नागरिक ांना मिळणार दिलासा
सिडकोचा काही भाग, पाथर्डी गाव आणि रोड तसेच राजीवनगरपासून खाली अगदी दीपालीनगरपर्यंतच मुकणे धरणाच्या जलवाहिनी योजनेतून पाणी पुरवले जाणार असून त्यामुळे या भागातील पाणी समस्या सुटणार आहे. पाथर्डी ते इंदिरानगरपर्यंतच्या भागात काही ठिकाणी मध्यरात्री तर काही ठिकाणी पहाटे अशी पाणीपुरवठ्याची चमत्कारीक वेळ आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सध्या प्रभाग क्रमांक ३० मधील पाणीप्रश्नाने उग्र रूप धारण केले असून, ेगेल्या आठवड्यात झालेल्या पूर्व प्रभाग समितीच्या बैठकीत सदस्य आक्रमक झाले व त्यांनी सभेवर बहिष्कार घातला आहे. या सर्व भागांना दिलासा मिळणार आहे.
नाशिक शहराला सध्या सुमारे साडेचारशे दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होतो तो आता साडेपाचशे दशलक्ष लिटर्सपेक्षा अधिक होईल. अर्थात, गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यात जलवाहिन्यांची कामे करण्यास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गळतीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
मुकणे धरणातील जॅकवेल (जलविहीर)चे काम ७६ टक्के पूर्ण झाले आहे. धरणात पाणी असल्याने हे काम पूर्ण करण्यात व्यत्यय येत आहे. पाइपलाइन आणि अन्य कामे ९० टक्के तर संपूर्ण योजनेचे सरासरी काम ८६ टक्के इतके पूर्ण झाले आहे.