येवला तालुक्यात पावसाने मका, कांदा रोपांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 09:04 PM2021-11-05T21:04:18+5:302021-11-05T21:05:19+5:30
दिवाळीच्या सणाला पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले.
जळगाव नेउर (नाशिक): येवला शहर आणि परिसरातील गावांमध्ये शुक्रवारी दि.५ रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाच्या सरीने शहरातील बाजारपेठासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मका, ,कांदा रोपे संकटात सापडल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. दिवाळीच्या सणाला पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले.
तालुक्यातील भाटगाव, धानोरे, नागडे, धामणगाव ,गोल्हेवाडी, सायगाव परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या ने शेतकऱ्यांचे मका ,मका चारा, कांदा रोपांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाले आहेत. शेतकऱ्यांचा मका शेतातच उभी असल्याने तसेच अनेक शेतकरी दिवाळी सणात व्यस्त असल्याने मजूरही आपल्या गावी गेल्याने शेतीची कामे खोळंबली आहे. त्यात पावसाने हजेरी लावल्याने अगोदरच कांदा रोपांची टंचाई भासत असल्याने पुन्हा पावसाच्या तडाख्यात कांदा रोपे सापडल्याने कांदा पिकही संकटात सापडले आहे. तसेच कांदा लागवडीवर दव आणि धुके पडणार असल्याने कांदा पिक खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.
आज येवला पूर्व भागात झालेल्या बेमोसमी पावसामुळे उन्हाळ कांदे रोप हातातून जाण्याची भीतीने शेतकरी धास्तावला आहे, बियाण्याची किंमत ही दहा हजार रुपये पायलीच्या वर आहे तरी ही खात्रीशीर बियाणे मिळेना. वाल्मिक कचरू साताळकर, नागडे ता.येवला, जि नाशिक