विंचूर दळवी परिसरात झेंडूचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:00 AM2019-10-24T01:00:27+5:302019-10-24T01:00:56+5:30
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विंचूरदळवीसह परिसरात झालेल्या पावसामुळे द्राक्षबागा, टमाटे, सोयाबीन तसेच झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या सणात फुलाचे नुकसान होत असल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जात असताना बळीराजाला केवळ बघत राहण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विंचूरदळवीसह परिसरात झालेल्या पावसामुळे द्राक्षबागा, टमाटे, सोयाबीन तसेच झेंडू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या सणात फुलाचे नुकसान होत असल्याने हातातोंडाशी आलेला घास वाया जात असताना बळीराजाला केवळ बघत राहण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार दोन दिवसांपासून विंचूरदळवी परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. या भागात द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात असल्याने फुलोऱ्यात आलेल्या बागांची गळकूज होत आहे. त्यामुळे औषध फवारणीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. हीच बाब टमाटा पिकासाठीदेखील घातक ठरू शकते.
टमाटा पिकाची पाने खराब होत असून, त्याचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. त्यामुळे या भागातील टमाटा उत्पादनात ५० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेषत: विंचूरदळवी परिसरात शेतकरी झेंडूच्या फुलांची शेती मोठ्या प्रमाणात करतात. ऐन दिवाळीच्या सणात फुलांना चांगली मागणी असते; परंतु पावसाने झेंडूची फुले सडण्यास सुरु वात झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसातच बळीराजा संकटात सापडला आहे.
रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त असला तरी खरिपाची मोठ्या प्रमाणात वाट लागली आहे. केवळ ऊस व भात पिकासाठी हा पाऊस पोषक आहे. त्यातही सोंगणीस आलेल्या भाताला हा पाऊस घातक ठरत आहे. शिवडे, विंचुरीदळवी, घोरवड, पांढुर्ली आदींसह परिसरातील गावांमध्ये सोयाबीनच्या सोंगणीस सुरुवात झाली आहे.
सोंगणी केलेला सोयाबीन पावसात भिजत आहे. मागील आठवड्यात या मालाला मिळत असलेला भाव कालपासून थोड्या प्रमाणात घसरला आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पावसामुळे अनेक गावांमध्ये सोंगणीस आलेल्या बाजरीची कणसे भिजली आहेत. कांद्याची रोपेही पावसामुळे खराब झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकरीवर्ग संकटात सापडला आहे.