धरणांच्या साठ्यात वाढ

By admin | Published: September 19, 2015 10:03 PM2015-09-19T22:03:27+5:302015-09-19T22:03:59+5:30

मालेगाव : गिरणा वाहिली दुथडी भरून; शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या

Damage storage growth | धरणांच्या साठ्यात वाढ

धरणांच्या साठ्यात वाढ

Next

मालेगाव : तालुक्यासह कसमादेत झालेल्या पावसाने येथील गिरणा दुथडी भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नदीपात्रात सध्या १८ हजार ६६४ क्युसेस पाणी सोडण्यात आले असून, गिरणा धरणातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील धरणांच्या साठ्यात वाढ झाली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, रब्बीच्या आशा उंचावल्या आहेत. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, येथील शहराबाहेरून वाहणाऱ्या गिरणा नदीला पूर आला असून, काठावर राहणाऱ्या नागरिकांना सावधागिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गिरणा नदीला पूर आला असून, ठेंगोडा येथील बंधाऱ्यातून १४ हजार ४४० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच चणकापूर धरणातून तीन हजार ५२४ क्युसेस पाण्याची भर पडत आहे. यामुळे नदीकाठच्या तसेच नदीपात्रात असलेल्या पाणीपुरवठा योजना जीवंत झाल्या आहेत. येथील सोयगाव व टेहरे दरम्यानच्या पुलाला पाणी लागले होते. तालुक्यातील अनेक गावांचा पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. गिरणा दुथडी भरून वाहू लागल्याने पूरपाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोसळलेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, काही धरणे पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहेत. यातील काही धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नद्यांना पूर आला आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजता चणकापूर धरणात दोन हजार २५२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. याची टक्केवारी ९२. ७९ आहे. यामुळे या धरणातून सव्वातीन हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले. पाटबंधारे विभागाच्या नोेंदीनुसार शनिवारी सकाळी साडेसात वाजता धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन हरणबारी धरणात एक हजार ५४, केळझरमध्ये ४५८ पाणीसाठा झाला. हे धरणे अनुक्रमे ९०.३९ तर ८०.०७ भरले. मात्र नाग्यासाक्या धरणातील पाणीसाठ्यात कोणतीही वाढ न झाल्याने ते कोरडे ठाक आहे. निकवेल : बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे आरम नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच केळझर धरण व छोट छोटी धरणेही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.बागलाण तालुक्यातील मुंजवाड, चौधाणा, कंधाणा, दहिदुले, चाफापाडा, डांगसौंदाणे, केळझर, तलाठी, जोरण, कपालेश्वर, किकवारी आदि गावांमध्ये जोरदार पाऊस झाला. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने या भागातील पाणीप्रश्न सुटणार आहे. छोट छोटी धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत. आरम नदीला पूर आल्याने निकवेल येथील शेतकऱ्यांनी नदीतील पाण्याचे जलपूजन केले. पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छावसह निकवेल विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक नीलेश वाघ, पोपट म्हसदे, भिका वाघ, कुणाल म्हसदे, पुंजाराम वाघ, निंबा वाघ, गोकुळ वाघ, प्रकाश वाघ आदि ग्रामस्थ जलपूजनासाठी उपस्थित होते. बागलाण पश्चिम पट्ट्यातील सर्वच नद्या-नाल्यांना पाणी आल्याने बळीराजा सुखावला आहे.केळझर धरणामध्ये मंगळवारपर्यंत ३० टक्के पाणीसाठा शिल्लक होता; मात्र गुुरुवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे केळझर धरण शंभर टक्के भरण्यात आले आहे. आगामी एक दोन दिवसात केळझर धरणही ओव्हरफ्लो होण्याची परिस्थिती आहे. त्यामुळे भागातील पाणीप्रश्न सुटेल अशी चर्चा शेतकरीवर्गात होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Damage storage growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.