सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात कांदा, बटाटा पिकासह द्राक्षबागांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 06:50 PM2021-02-20T18:50:59+5:302021-02-20T18:51:48+5:30
सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ठाणगाव, विंचुरदळवी व पांढुर्ली परिसरातील शेतकऱ्यांच्या कांदा, बटाट्यासह द्राक्षबागांचे नुकसान झाले. तालुक्यातील विंचुरीदळवी, पांढुर्ली व ठाणगाव परिसरात गुरुवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गारांसह अवकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, बटाटा पिकांना मोठा फटका बसला असून द्राक्षाचे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

गुरुवारी सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होते. अशातच सायंकाळी अचानक वादळ व पावसाला सुरुवात झाली. काही प्रमाणात गारांही पडल्या. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवडे, विंचुरीदळवी, घोरवड, पांढुर्ली, आगसखिंड, बेलू गावांमध्ये शेकडो एकरावर बटाटा व कांदा लागवड झालेली आहे. पावसामुळे कांदा व बटाटा पिकासह द्राक्ष बागांचेसुद्धा अतोनात नुकसान झाले. कांदा व बटाटा पिकावर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
वातावरण बदलाने सुरुवातीपासूनच कांदा व बटाट्याला महागडी कीटकनाशके शेतकऱ्यांनी फवारली होती. त्यातच अवकाळीचा तडाखा, बाजारभावाची शाश्वती नाही अशा संकटात शेतकरी सापडला आहे. जगावे तरी कसे असे शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुढील पिकांसाठीचे नियोजन कोलमडले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना धीर द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
वातावरण बदलामुळे शेतकरी हवालदिल
सततच्या वातावरण बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कांदा व बटाटा पीक हे पूर्णपणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. बटाटा बियाणे शेतकऱ्यांनी चढ्या दराने खरेदी केले होते. कांदा रोप बनविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली होती. बटाटा पिकाला अगदी लागवडीपासून वातावरणाचा फटका बसला होता. लागवडीच्या वेळेलाही अवकाळीचा सामना पिकांना करावा लागला होता. कसेबसे पीक हातात येण्याची आशा होती, परंतु अवकाळीने ती धुळीस मिळविली.