परतीच्या पावसाने द्राक्षबागांची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 07:06 PM2019-11-10T19:06:03+5:302019-11-10T19:06:22+5:30
गेल्या आठवड्यात झालेला परतीचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पंचाळे परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सिन्नर : गेल्या आठवड्यात झालेला परतीचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पंचाळे परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सिन्नर तालुक्यातील सांगवी, सोमठाणे, दहीवडी या भागात द्राक्ष उत्पादक मोठ्या प्रमाणात आहे. डाळिंबबागांना मध्यंतरी तेल्या रोग आल्याने शेतकऱ्यांनी कमी पाणी लागते म्हणून हजारो एकरवर द्राक्षबागेची लागवड केली. सुरुवातीला एक महिना दुष्काळी स्थिती होती, मात्र नंतर अतिवृष्टी, परतीचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे थॉमसन, सोनाका, शरद क्लोन, सुधाकर आदी जातींच्या द्राक्षबागांवर वातावरणाचा गंभीर परिणाम झाला. सर्व द्राक्षबागांवर सड, कूज, तडतोडे पडून द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे.
या हंगामात एकरी द्राक्षबाग उत्पन्न घेण्यासाठी कमीत कमी तीन ते चार लाख रुपये खर्च झालेला आहे. यासाठी अनेक शेतकºयांनी बँक व खासगी सावकारांकडून कर्ज घेत बागा उभ्या केल्या आहेत. यंदा अस्मानी-सुलतानी संकट आल्याने शेतकºयांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्याचबरोबर खरीप हंगामातील बाजरी, मका, कांदा, सोयाबीन, भुईमूग, कांद्याच्या रोपांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत असून, भविष्यात काय? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पिकांचे पंचनामे करून द्राक्ष बागायतदारांना एकरी चार लाख रुपये भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
यावर्षीच्या खरीप हंगामात इतर पिकांचा खर्च व उत्पन्नाचा हिशेब करून रोख स्वरूपात नुकसानभरपाई देण्याची मागणी सांगवी येथील संजय रायते, भागवत घुमरे, केशव मधुकर घुमरे, राजाराम घुमरे, संजय घुमरे, सोमठाणे येथील सोमनाथ कोकाटे, कुंतल कोकाटे, किरण कोकाटे, राहुल कोकाटे, दहीवडी येथील दिलीप आरोटे, मनोज गाडे, संजय गाडे, द्वारकानाथ गाडे आदी द्राक्ष बागायतदारांनी केली आहे.