दमण गंगा पिंजाळ दोन राज्यांच्या सहमतीत अडकला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 01:26 AM2022-02-02T01:26:18+5:302022-02-02T01:26:42+5:30
महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाचा जेमतेम उल्लेख आणि ताेही दोन्ही राज्यांच्या संमतीने मंजूर होणार ही एकमेव ठळक बाब वगळली, तर नाशिकच्या दृष्टीने कोणतीही भरीव घोषणा अथवा तरतूद प्राथमिक टप्प्यात दिसत नाही. त्यामुळे नाशिककरांचा बऱ्यापैकी अपेक्षा भंग झाला आहे.
नाशिक : महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाचा जेमतेम उल्लेख आणि ताेही दोन्ही राज्यांच्या संमतीने मंजूर होणार ही एकमेव ठळक बाब वगळली, तर नाशिकच्या दृष्टीने कोणतीही भरीव घोषणा अथवा तरतूद प्राथमिक टप्प्यात दिसत नाही. त्यामुळे नाशिककरांचा बऱ्यापैकी अपेक्षा भंग झाला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिककरांना काही मेाठ्या घोषणांची आणि यापूर्वी घोषणा झालेल्या प्रकल्पांना चालना मिळण्याची अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात मंगळवारी (दि.१) घोषित अर्थसंकल्पात नाशिककरांचा अपेक्षाभंग झाला आहे. दमण गंगा पिंजाळ व पार- तापी- नर्मदा या दोन प्रकल्पांना निधी देण्याची तयारी दर्शवली आहे. यापैकी दमणगंगा- पिंजाळ लिंक नदी जोड प्रकल्पाचे पाणी महाराष्ट्रातील दमणगंगा खोऱ्यातून पिंजाळ खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. यासंदर्भात काही ठोस घोषणा होण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र दोन्ही राज्यांची म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातची समंती असल्यासच हा प्रकल्प पुढे नेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन राज्यांत सहमती होण्यावर या प्रकल्पाचे भवितव्य असल्याने त्या विषयी ठोस निर्णय झालेला नाही.
गेल्या वर्षी देशातील पहिला निओ मेट्रो प्रकल्प नाशिक शहरासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई- पुणे सेमीहायस्पीड रेल्वेही मंजूर करण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांसाठी राज्य शासनाने आपला आर्थिक वाटा म्हणून २० टक्के सोय केली आहे. ६० टक्के समभागातून उभारण्यात येणार आहेत. मात्र, केंद्र शासनाकडून कोणत्याही प्रकारे आपला आर्थिक वाटा देण्याची तरतूद केली नसल्याने या प्रकल्पांना चालना कशी मिळणार, असा प्रश्न आहे, तसेच निओ मेट्रोचा डीपीआर अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्री मंडळासमोर असून त्याबाबत वर्षभरापासून निर्णय झालेला नाही.