आता नाशिक शहरात दुचाकीने धावणार ‘दामिनी’, 44 महिलांचे स्वतंत्र पथक सक्रीय
By अझहर शेख | Published: August 14, 2023 06:51 PM2023-08-14T18:51:56+5:302023-08-14T18:52:05+5:30
ग्रामीण भागात धावणारे पोलिसांचे ‘दामिनी मार्शल पथक’ आता नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अर्थात शहरातील रस्त्यांवरून गस्त करताना नजरेस पडणार आहे.
नाशिक : ग्रामीण भागात धावणारे पोलिसांचे ‘दामिनी मार्शल पथक’ आता नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अर्थात शहरातील रस्त्यांवरून गस्त करताना नजरेस पडणार आहे. यामुळे टवाळखोर, व छेडछाड करणाऱ्यांची आता मात्र गय केली जाणार नाही. सोमवारी (दि.१४) स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी या महिला पोलिसांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखविला. नाशिक शहर व परिसराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत चालला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे गुन्हेगारीमध्येही वाढ होत आहे. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची उपस्थिती जनमानसात दिसण्यासाठी ४४ महिलांचे ‘दामिनी बिट मार्शल’ पथक पोलिस आयुक्तालयाने कार्यान्वित केले.
या पथकाला पल्सरसारखी नवीकोरी दमदार दुचाकी देण्यात आली आहे. एका दुचाकीवरून हेल्मेटधारी दोन महिला पोलिसांची शहरात गस्त राहणार आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, या उद्देशाने पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून या पथकाची निर्मिती आयुक्तालय स्तरावर करण्यात आली आहे. सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून या ‘दामिनी मार्शल’चा प्रवास राहणार आहे. या पथकाची ‘निर्भया’ पथकाला मोठी साथ लाभणार आहे, असा विश्वास आयुक्तालयाकडून व्यक्त करण्यात येत आहे. निर्भयासह दामिनी पथकाला सैन्यदलाच्या जवानांशी जुळणारा स्वतंत्र असा गणवेश देण्यात आला आहे. निर्भया पथकांची गस्त ही साध्या मोटारीतून असते; मात्र दामिनी आता दुचाकीवरून धावताना दिसणार आहे.
पथकाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे शिवसेना शिंदे गटाचे नेते अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.
...अशी असेल पथकाची कार्यपद्धती
- ‘दामिनी’ पथक लाठी-काठीसह सशस्त्र गस्त करणार
- महिलांची रेलचेल असलेली व छेड काढल्या जाणाऱ्या ठिकाणांवर लक्ष
- शाळा, महाविद्यालय, बसस्थानके, बाजारपेठा, भाजीबाजार, उद्याने, गोदाकाठावर गस्त
- शहराजवळच्या पर्यटनस्थळांना भेटी आणि संशयितांवर वॉच.
- टवाळखोरांचा शोध घेत गोपनीयरित्या चित्रीकरण करणार
- स्थानिक पोलिस ठाण्यांच्या गस्ती पथकांना तात्काळ पाचारण
- गुन्हेगारांच्या प्रवृत्तीविषयी जनजागृतीवर भर.