पुनंद पाणी योजनेविरोधात कळवणकरांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 06:23 PM2019-07-01T18:23:17+5:302019-07-01T18:23:35+5:30
शेतकऱ्यांची नाराजी : सुपलेदिगरचा ठराव रद्द करण्याची मागणी
कळवण : पुनंद प्रकल्पातून जाणा-या सटाणा नगरपरिषदेच्या जलवाहिनी योजनेला कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा विरोध लक्षात घेऊन सरकारने काम थांबवावे या मागणीसाठी दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर चार तास धरणे आंदोलन करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
शासनाचे धोरण,न्यायालयाचा आदेश, शासनाची भूमिका याचा निषेध करून आंदोलकांनी लोकप्रतिनिधीच्या भूमिकेवर रोष प्रकट केला. सुपलेदिगर ग्रामपंचायतने सटाणा नगरपरिषदेच्या योजनेसाठी जागा देण्यासंदर्भात दिलेला ग्रामसभेचा ठराव रद्द करण्याची मागणी यावेळी सवर्पक्षीय नेते व शेतकरी बांधवांनी केली. चार तास धरणे आंदोलनानंतर तहसिलदार बंडू कापसे यांना कृती समितीच्यावतीने आमदार जे पी गावित , जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार , कृती समितीचे अध्यक्ष देविदास पवार , शैलेश पवार , कारभारी आहेर , राजेंद्र भामरे , महेंद्र हिरे , हेमंत पाटील , संदीप वाघ यांनी निवेदन यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ जयश्री पवार , धनंजय पवार ,पंचायत समितीचे सभापती जगन साबळे , शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे ,देवळा तालुकाध्यक्ष पंडीत निकम ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव ,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे ,माकपचे हेमंत पाटील ,रायुकाचे संदीप वाघ, जितेंद्र वाघ ,वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील , शेतकरी नेते शांताराम जाधव , आदिवासी नेते अर्जुन बागुल ,लालाजी जाधव यांच्यासह कळवण व देवळा तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.