सुधारित आकृतिबंधासाठी कृषी सहायक संघटनेचे धरणे
By Admin | Published: June 20, 2017 01:46 AM2017-06-20T01:46:06+5:302017-06-20T01:46:24+5:30
ठिय्या : १० जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा मृद व जलसंधारण विभागाकडे वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने सोमवारी (दि.१९) जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोेलन केले. मागण्या मान्य न झाल्यास १० जुलैपासून कृषी सहायक बेमुदत काम बंद आंदोेलन करणार आहेत.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग स्थापन केला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय ३१ मे २०१७ रोजी निर्गमित केला आहे. परंतु अद्याप कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध काय असेल, याबाबत कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ज्यामुळे कृषी विभागात भविष्य काय? असा प्रश्न प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडला आहे.
सोमवारी झालेल्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष शरद थेटे, कार्याध्यक्ष अरविंद आढाव, राजेंद्र काळे, राजेंद्र सावंत, भास्कर बिन्नर, रूपाली लोखंडे, छाया थोरात, दिगंबर पगार, सुनील सोनवणे, जयकीर्तीमान पाटील, सुनीता कडनोर, शबाना अतार, मनीषा पवार आदी सहभागी झाले होते.