धरणांचे काठ मद्याच्या बाटल्यांमुळे बनले धोक्याचे ‘घाट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:14 AM2021-03-15T04:14:28+5:302021-03-15T04:14:28+5:30

----- नाशिक : शहराजवळील गंगापूर धरणाचा बॅकवॉटरचा परिसर असो किंवा काश्यपी, गौतमी, भावलीचा परिसर असो, या धरणांच्या काठालगतचे पक्षीजीवन ...

Dams become dangerous 'ghats' due to liquor bottles | धरणांचे काठ मद्याच्या बाटल्यांमुळे बनले धोक्याचे ‘घाट’

धरणांचे काठ मद्याच्या बाटल्यांमुळे बनले धोक्याचे ‘घाट’

googlenewsNext

-----

नाशिक : शहराजवळील गंगापूर धरणाचा बॅकवॉटरचा परिसर असो किंवा काश्यपी, गौतमी, भावलीचा परिसर असो, या धरणांच्या काठालगतचे पक्षीजीवन धोक्यात येत आहे. त्याला मुख्य कारण ठरत आहे, ते म्हणजे मद्यपींच्या ओल्या पार्ट्या. मद्य रिचविल्यानंतर रित्या झालेल्या बाटल्या धरणांच्या काठालगतच्या दगडांवर फोडून सर्वत्र काचा विखरून ही मंडळी घराकडे परततात. मात्र, या बाटल्यांच्या काचांमुळे या भागात राहणाऱ्या विविध स्थलांतरित देशी-विदेशी पक्ष्यांनाही हानी पोहोचत असल्याचे काही पक्षीप्रेमींच्या निदर्शनास आले आहे.

शहराजवळील गंगापूर धरणाचा परिसर हा अत्यंत संवेदनशील आहे. या धरणाच्या पाण्यावर नाशिककरांची तहान भागते. मात्र, याच शहरामध्ये राहणाऱ्या काही मद्यपींना त्याची तसूभरही जाण नसल्याने, ही मंडळी सर्रासपणे सावरगाव, वनविभागाच्या रोपवाटिकेच्या पाठीमागील बाजूने धरणांचा काठ गाठून तेथे ओल्या पार्ट्या रंगविते. धरणांच्या जलसाठ्यावरून येणाऱ्या थंडगार हवेच्या झुळुकीचा मनमुराद आनंद लुटत, मद्यपींना झिंग चढल्यानंतर कशाचेही भान न बाळगता, हातातील रिकाम्या बाटल्या फोडून जणू काही आपण फार मोठे ‘शौर्य’ दाखविले, या आविर्भावात ही मंडळी असतात. त्यावेळी त्यांची एखाद्या जागरूक नागरिकाने समजूत काढण्याचा जरी प्रयत्न केला, तरी तो प्रयत्न त्याच्या अंगलट येण्याची दाट शक्यता असते. मद्याच्या नशेत असल्यामुळे हे नशेबाज थेट हमरीतुमरीवर उतरतात. यामुळे काही पक्षीप्रेमींना याचा वाईट अनुभवही काही दिवसांपूर्वी आला. यामुळे तालुका पोलिसांनी या भागात गस्त वाढवून मद्यपींना आवर घालण्याची मागणी होत आहे. पोालिसांकडून मद्यपींच्या टोळक्यांना मोकळीक दिली जात असल्याच्याही तक्रारी या भागातील नागरिकांनी केल्या आहेत.

---इन्फो---

विखुरलेल्या काचांमुळे पक्षी होत आहेत जखमी

गंगापूर धरण समूहातील काश्यपी, गौतमीगोदावरी, आळंदी, तसेच वाघाड ही धरणे स्थलांतरित पक्ष्यांकरिता ही उत्तम ‘कनेक्टिविटी’ आहे. देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी या धरणांच्या काठांवर विसावतात, तसेच आजूबाजूला मुक्कामी असतात. पक्षी जलाशयावर जरी विहार करत असले, तरी ते अंडी मात्र जलाशयाच्या काठांवरच घालतात. काठावरील दलदली जागा हे त्यांचे मुख्य आश्रयस्थान असते. त्यामुळे या भागात विखुरलेल्या मद्यांच्या काचांमुळे त्यांना हानी पोहोचत आहे. यापूर्वी काही पक्षी जखमी झाल्याच्याही घटना घडल्या असल्याची निरीक्षणे नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक या संस्थेने नोंदविले आहे.

===Photopath===

140321\14nsk_5_14032021_13.jpg~140321\14nsk_6_14032021_13.jpg

===Caption===

धरणांच्या काठावर पडलेल्या बाटल्या.~धरणांच्या काठावर पडलेल्या बाटल्या.

Web Title: Dams become dangerous 'ghats' due to liquor bottles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.