‘नृत्यानुष्ठान’ : 'कथ्थक' नृत्याविष्कारातून नाशिकमध्ये नटराज गोपीकृष्ण यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 08:37 PM2017-11-19T20:37:53+5:302017-11-19T20:43:14+5:30
गुरू विद्याहरी देशपांडे यांच्या शिष्या भक्ती देशपांडे यांनी अंतिम टप्प्यात कथ्थक नृत्याविष्काराला गणेश परणने प्रारंभ केला. त्यानंतर ११ मात्रांचा चारताल की सवारी सादर केली. तसेच चैती यंही भैया मोतिया हैरा गयी... ही ठुमरी आणि तीनतालमध्ये होरीच्या नृत्याविष्काराने कथ्थक कलेच्या नृत्यानुष्ठानचा समारोप करण्यात आला.
नाशिक : देशासह परदेशात आपल्या कथ्थक नृत्यकलेचा आविष्कार दाखविणा-या लता बाकलकर यांच्या शिष्या नृत्यांगना तन्वी पालव यांचा रुद्रताल आणि नृत्यांगना भक्ती देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘चारताल की सवारी’ या कथ्थक नृत्याविष्काराने उपस्थित रसिकांची मने जिंकली.
निमित्त होते, नटराज गोपीकृष्ण जयंतीच्या औचित्यावर कीर्ती कलामंदिरच्या वतीने आयोजित ‘नृत्यानुष्ठान’ कार्यक्रमाचे! परशुराम साईखेडकर सभागृहात रविवारी (दि.१९) रंगलेल्या ‘नृत्यानुष्ठान’च्या तिस-या पुष्पाला कलाप्रेमींनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुकुंद पानसे, जगदीश फडके, रेखा नाडगौडा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालव यांनी ११ मात्रांचा रुद्रताल सादर करत रसिकांची दाद मिळविली. परंपरेनुसार त्यांनी थाट, आमद, विलंबित परण, परण, तिहाई, रेला आदी प्रकारांत कथ्थक कलाविष्काराचे सादरीकरण केले. यानंतर पालव यांनी सादर केलेल्या पारंपरिक ठुमरीने कार्यक्रमात आगळा रंग भरला. ‘ऐरी सखी मोरे पिया घर आये...’ या ठुमरीने उपस्थितांची दाद मिळविली.
कार्यक्रमात गुरू विद्याहरी देशपांडे यांच्या शिष्या भक्ती देशपांडे यांनी अंतिम टप्प्यात कथ्थक नृत्याविष्काराला गणेश परणने प्रारंभ केला. त्यानंतर ११ मात्रांचा चारताल की सवारी सादर केली. तसेच चैती यंही भैया मोतिया हैरा गयी... ही ठुमरी आणि तीनतालमध्ये होरीच्या नृत्याविष्काराने कथ्थक कलेच्या नृत्यानुष्ठानचा समारोप करण्यात आला. एकूणच नृत्याविष्कारातून गुरूवर्य नटराज गोपीकृष्ण यांना ‘नृत्यानुष्ठान’च्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. यावेळी विवेक मिश्रा (तबला), गायन व संवादिनी रसिका जानोरकर, हिमांशु गिंडे (बासरी) साथसंगत केली.