साकोऱ्यात पाणीटंचाईमुळे हंडा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:26 PM2019-04-10T21:26:57+5:302019-04-10T21:28:12+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात अल्पपावसामुळे व उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने यावर्षी पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या अवघ्या तीन टँकरने गावाला पाणीपुरवठा केला जातो आहे. मात्र ते पाणी प्रत्येकाला मिळत नसल्याने गावातील काही महिला आणि पुरु षांनी रिकामे हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालय परिसरात हंडा मोर्चा काढून आपली कैफियत मांडून सदर पाणी नळाद्वारे सोडण्याची मागणी केली.

गतवर्षी पावसाळ्यात या परिसरात सरासरी अवघा ३० टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच कोणतेही नियोजन न केल्याने आज नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गावात सन २०११च्या जनगणनेनुसार दहा हजार लोकसंख्या असलेल्या ठिकाणी अवघ्या चार टँकरची व्यवस्था केली होती. त्यातही वाड्यावस्त्यांवर १२ हजार लिटरचे एक टँकर, तर गावासाठी तीन टँकरद्वारे एकूण दिवसाला दीड लाख लिटर पाणी गावाच्या चार बाजूला असलेल्या हौदात सोडले जात होते.
बुधवारी (दि.१०) सकाळी गावातील काही महिला-पुरु षांनी याविरोधात रिकामे हंडे होती घेत ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा नेऊन आम्हाला पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत शासनाने गावाच्या १६ हजार लोकसंख्येचा विचार करता टँकरची संख्या वाढवून सर्व पाणी जलकुंभात टाकून गावात एकूण ८५० नळधारकांना एकूण १४ विभागणीत पाणीवाटप करावे, अशी जोरदार मागणी केली. त्यावर नवनिर्वाचित सरपंच अलका कदम, उपसरपंच संदीप बोरसे, रमेश बोरसे, संजय सुरसे आदींनी गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिले. ग्रामविकास अधिकारी बी. बी. सरोदे यांची अनुपिस्थती असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
मोर्चात छाया सुरसे, सुवर्णा मोरे, मंगल मोरे, निर्मला वाघ, चंद्रकला बोरसे, सुरेखा बोरसे, चंद्रकला बच्छाव, उषाबाई सुरसे, संगीता बोरसे, उज्ज्वला देशमुख, सुनीता बोरसे, रमाबाई जाधव, आशा बोरसे, वसंत बोरसे, धरमचंद कासलीवाल, शरद सोनवणे, माणिक हिरे, प्रताप बोरसे, शरद बोरसे, सुनंदा बोरसे, संगीता आहिरे, शोभा बोरसे, संदीप जाधव, नंदाबाई बच्छाव आदी सहभागी झाले होते.अनेक कुटुंबांना हे पाणी मिळत नसल्याने तसेच एखाद्या दिवशी एखादे टँकर न आल्यास पाणीवाटपाचे नियोजन पूर्णपणे कोलमडून जात आहे. आता तर गेल्या तीन दिवसांपासून अवघे तीनच टँकर येत असून, टॅँकरने पुरविले जाणारे पाणी पिवळसर असून, ते पिण्यायोग्य नसल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.