शहर सुधार समिती बैठकीला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:14 AM2017-08-09T00:14:11+5:302017-08-09T00:14:23+5:30
शहर सुधार समितीवर प्रशासनाकडून काहीच प्रस्ताव येणार नसतील तर नुसती चर्चा करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल उपस्थित करत सदस्यांनी समितीच्या अधिकाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
नाशिक : शहर सुधार समितीवर प्रशासनाकडून काहीच प्रस्ताव येणार नसतील तर नुसती चर्चा करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल उपस्थित करत सदस्यांनी समितीच्या अधिकाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समितीच्या पहिल्याच सभेला खातेप्रमुखांनी दांडी मारल्याने दुय्यम फळीतील अधिकाºयांनी केवळ माना डोलावण्यापलीकडे काहीही भूमिका निभावली नाही. त्यामुळे कोणताही निर्णय न होता नुसत्या चर्चेवरच सभा आटोपती घ्यावी लागली.
महापालिकेच्या शहर सुधार समितीची पहिलीच बैठक सभापती भगवान दोंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. समितीच्या विषयपत्रिकेवर फूटपाथची सुधारणा आणि पार्किंगचे नियोजन हे दोन विषय उपसभापती स्वाती भामरे यांनी मांडलेले होते. सभेच्या प्रारंभीच सदस्यांनी प्रशासनाचे प्रस्ताव कुठे आहेत, असा सवाल उपस्थित केला. शहर सुधार समितीशी बांधकाम, उद्यान, नगररचना, अतिक्रमण या विभागांचा संबंध येत असल्याने संबंधित विभागांचे खातेप्रमुख कुठे आहेत, असा जाबही सदस्यांनी नगरसचिवांना विचारला. त्यावेळी नगरसचिवांनी संबंधिताना सभेचे पत्र दिले असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सदस्यांनी पुढच्या सभेला खातेप्रमुखांची उपस्थिती आवश्यक असल्याचे सांगितले. सभेत सुवर्णा मटाले यांनी शहरातील मनपाच्या मोकळ्या भूखंडांवर वाहनतळांची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करतानाच यशवंत मंडईच्या जागेवर लवकरात लवकर बहुमजली वाहनतळ साकारण्याची मागणी केली. रुची कुंभारकर यांनीही डीपीरोडलगत फूटपाथ तयार करण्याची सूचना केली तसेच आवश्यक त्या ठिकाणी दुभाजक टाकण्याचीही मागणी केली. सत्यभामा गाडेकर यांनी समितीच्या अधिकारकक्षाबाबत प्रश्न उपस्थित केला. साईड पट्ट्या, आरक्षित भूखंडांचा विकास, दिशादर्शक फलक, नदीकिनारी पर्यटन स्थळाची निर्मिती आदी सूचनाही त्यांनी केल्या. पंडित आवारे यांनी जुन्या धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याठिकाणी पार्किंगचे नियोजन करण्याची सूचना केली. स्वाती भामरे यांनी गरज असेल तेथेच पेव्हर ब्लॉक बसविण्याची सूचना केली. तुटलेल्या दुभाजकांच्या दुरुस्तीचेही आदेश दिले. सभेला अधिकारी उपस्थित होते.