चौदाशे विद्यार्थ्यांची सेट परीक्षेला दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:58 PM2019-06-23T23:58:35+5:302019-06-24T00:11:00+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नाशिक शहरातील १२ केंद्रांवर सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षा रविवारी (दि.२३) घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ७ हजार ४६८ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील ६ हजार ४२ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १ हजार ४२६ उमेदवारांनी दांडी मारली.
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे नाशिक शहरातील १२ केंद्रांवर सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षा रविवारी (दि.२३) घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ७ हजार ४६८ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील ६ हजार ४२ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १ हजार ४२६ उमेदवारांनी दांडी मारली.
सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या सेट परीक्षेत या वर्षापासून काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, नवीन पद्धतीनुसार रविवारी ही परीक्षा घेण्यात आली. नवीन पद्धतीनुसार तीन ऐवजी दोनच पेपरचा या परीक्षेत समावेश होता. यातील पेपर एकमध्ये १०० गुणांसाठी सर्वसाधारण विषयावरील ५० प्रश्न विचारण्यात आले होते. तर पेपर दोन हा उमेदवाराने निवडलेल्या विषयावर आधारित होता. यात २०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारण्यात आले होते. केटीएचएम, सीएमसीएस, व्ही. एन. नाईक, भोसला कॉलेज, पंचवटी कॉलेज, एचपीटी कॉलेज, सातपूर व सिडको महाविद्यालय यांसह बारा वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा पार पडली. दरम्यान, सेटच्या स्वरूपात या वर्षापासून केलेल्या बदलांमुळे परीक्षेचे स्वरूप आणि काठिण्य पातळी कमी झाल्याचे परीक्षार्थींकडून सांगण्यात आले.