दांडीबहाद्दर ग्रामसेवक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:52 AM2017-09-23T00:52:15+5:302017-09-23T00:52:20+5:30
दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसूर आणि वारंवार दांड्या मारणे तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना चांगलेच गरम पडले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी इजमाने येथील दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत, तर एका ग्रामविस्तार अधिकाºयाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याने पंचायत समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सटाणा : दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसूर आणि वारंवार दांड्या मारणे तालुक्यातील दोन ग्रामसेवकांना चांगलेच गरम पडले असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी इजमाने येथील दोघा ग्रामसेवकांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिले आहेत, तर एका ग्रामविस्तार अधिकाºयाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याने पंचायत समिती वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा उबलब्ध होण्याबरोबरच ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजातदेखील पारदर्शकता यावी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीणा यांनी पावले उचलली आहेत. त्यानुसार बागलाण तालुक्यातील बहुतांश गावचे आॅनलाइन कामकाज सुरू करण्यात आले आहे. तसेच हगणदारीमुक्त गाव करण्यासाठी शौचालयाची कामेदेखील प्रगतिपथावर आहेत. असे असताना इजमाने येथील बापू धुडकू अहिरे आणि विनायक पोपट सूर्यवंशी या दांडीबहाद्दर ग्रामसेवकांमुळे गावकºयांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तसेच दप्तर दिरंगाईमुळे त्या गावातील शौचालयाची कामे न झाल्यामुळे हागणदारीमुक्त योजनेचा फज्जा उडाला आहे. आॅनलाइन दप्तर न केल्यामुळे कामकाजात पारदर्शकता दिसून येत नसल्यामुळे दोघा ग्रामसेवकांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवत निलंबनाचे आदेश दिले आहेत तर ग्रामविस्तार अधिकारी नितीन देशमुख यांच्यावरदेखील निलंबनाची टांगती तलवार आहे. त्यांनी स्वत:चा भ्रमणध्वनी बंद करून ठेवणे. ठेंगोडा येथील अतिक्रमण केल्याप्रकरणी चौकशीत कसूर केला म्हणून त्यांनादेखील कारणेदाखवा नोटीस बजावल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
बागलाण तालुक्यात दांडीबहाद्दर ग्रामसेवक जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आहेत. अशा निष्क्रिय ग्रामसेवकांमुळे गावाच्या विकासावर मोठा परिणाम होत आहे. हे टाळण्यासाठी त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार दोन ग्रामसेवकांचे निलंबन करण्यात आले असून, ग्रामविस्तार अधिकारी नितीन देशमुख यांनादेखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आगामी काळात शिक्षकांच्या बाबतीतदेखील हेच सूत्र राहणार असल्याचे बागलाणचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी सांगितले.