दांडिया प्रेमींच्या उत्साहाला उधाण
By admin | Published: October 6, 2016 01:42 AM2016-10-06T01:42:40+5:302016-10-06T01:42:52+5:30
रास रंगला : गुजराथी वेशभूषेचे आकर्षण
नाशिक : नवरात्रीचे चार दिवस उलटल्यानंंतर पावसाने उपडीप दिल्याने शहरात दांडिया प्रेमींच्या उत्साहाला उधाण आले. ठिकठिकाणच्या नवरात्रोत्सवात तरुणाईने गर्दी केल्याने उत्सवाच्या पाचव्या दिवशी खऱ्या अर्थाने दांडिया रास रंगला. पंचवटी कारंजा, निमाणी, दिंडोरीरोड, कॉलेजरोड तसेच विविध लॉन्सवरही गरब्याचा रंग चढल्याचे दिसून आले.
शहरात नवरात्रोत्सवानिमित्त घनकर लेन, मेनरोड, पंचवटी, इंदिरानगर, सिडकोसारख्या भागात सार्वजनिक मंडळांनी केलेल्या रोषणाईने शहर उजळून निघाले असून वेगवेगळ्या वाद्यांवर रंगलेला दांडिया आणि गरबा पाहण्यासाठीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
दांडियासाठी तरुणाईमध्ये गुजराथी वेशभूषेचे आकर्षण असल्याने विविध ठिकाणच्या गरबा दांडियांमध्ये गुजराथी वेशभूषा आणि गुजराथी संगीताची उत्सावात धूम दिसत आहे. तसेच हिंदी व मराठी चित्रपट गीतांसह व मराठी लोकगीतांच्या तालावर दांडिया खेळण्यात तरुणाई दंग झाली असून टिपरीवर पडणारी टिपरी दांडिया पाहण्यासाठी जमलेल्यांनाही रासलीलेमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या उत्तरार्धात हा रासरंग अधिकच बहरत जाण्याचे संकेत शहरातील विविध ठिकाणी रंगलेल्या गरबा आणि दांडियाच्या माध्यमातून मिळत आहे. (प्रतिनिधी)