‘दुबई’मध्ये रंगणार ‘दंगल’
By Admin | Published: February 10, 2017 12:36 AM2017-02-10T00:36:30+5:302017-02-10T00:36:41+5:30
राष्ट्रवादीचे पॅनल : कॉँग्रेस, भाजपात फूट
अझहर शेख नाशिक
धनिकांचा प्रभाग म्हणून ‘दुबई’ असे म्हटल्या जाणाऱ्या प्रभागातील लढती येथील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरू शकतात. भाजपा, आणि कॉँग्रेस मधील फुट यामुळे येथील निकालही प्रतिष्ठेचा बनला आहे.
प्रभाग १४मधून कॉँग्रेसच्या विद्यमान महिला नगरसेवकांनी हातावर ‘घड्याळ’ बांधल्याने कॉँग्रेसच्या एकमेव महिला उमेदवार रिंगणात आहे. राष्ट्रवादीचे पॅनल तयार झाले असले तरी शिवसेना व मनसेचे या प्रभागातील पॅनल शाबूत राहिल्याने त्यांचे राष्ट्रवादीला आव्हान राहणार आहे. महापालिकेच्या ३१ प्रभागांपैकी सर्वाधिक ४० उमेदवार या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपा, शिवसेना आणि कॉँग्रेस या तीन प्रमुख पक्षांमध्ये चुरस होणार आहे. दलित-मुस्लीम बहुल परिसर असल्यामुळे मनसे, समाजवादी, बसपा, अवामी विकास पार्टी, एआयएमआयएम या पक्षांकडूनही उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहे. वीस उमेदवार अपक्ष म्हणून लढत देणार आहेत.
प्रभाग १४ मध्ये कॉँग्रेस-राष्ट्रवादी या मित्र पक्षाच्या आघाडीनुसार प्रत्येकी दोन जागा वाटप करण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादीकडून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून शोभा साबळे, सर्वसाधारण गटातून सुफीयान जीन यांना उमेदवारी देण्यात आली होती; मात्र कॉँग्रेसकडून इच्छुक असलेले नसीरखान पठाण यांनीही राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करत मनगटावर घड्याळ बांधणे पसंत केले. तसेच कॉँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका समीना मेमन यांना कॉँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली असतानाही त्यांनी राष्ट्रवादीच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज भरला.
या प्रभागात राष्ट्रवादीचे चार उमेदवारांचे पॅनल तयार झाले आणि कॉँग्रेसच्या १४ क सर्वसाधारण गटातून शहानूर शेख या एकमेव महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या गटात शेख यांना मित्रपक्ष राष्ट्रवादीचे पठाण यांचे आव्हान असणार असून मैत्रिपूर्ण लढत या गटात पहावयास मिळणार आहे. उर्वरित तीन जागांवर मात्र कॉँग्रेसकडे उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीला सेनेचे आव्हान असणार आहे.
सेना-भाजपाचे कडवे आव्हान
४प्रभाग १४मध्ये शिवसेना पक्षानेदेखील चार उमेदवार दिले आहेत. यामध्ये पक्षाने अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातून दोन महिला आणि सर्वसाधारण गटातून दोन मुस्लीम पुरुष उमेदवार दिले आहेत. यामुळे जरी आघाडीचा हा प्रभाग बालेकिल्ला राहिला असला तरी या पंचवार्षिकमध्ये सेना-भाजपाचे राष्ट्रवादीला कडवे आव्हान राहणार आहे. शिवसेनेकडून मुजाहिद शेख, सायली काळे, रुपाली डहाके आणि मैनुद्दीन शेख हे रिंगणात, तर भाजपाचे तीनपैकी दोन मुस्लीम आहेत.