नायगाव घाटाचे सौंदर्य धोक्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:34 PM2018-10-19T17:34:28+5:302018-10-19T17:35:25+5:30
सिन्नर- सायखेडा रस्त्यावर असलेल्या नायगाव घाटात विविध प्रकारचा कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे निसर्ग संपन्न घाट परिसर सध्या कचरा डेपो बनला असून घाटाचे सौंदर्य धोक्यात आले आहे.
तालुक्याच्या उत्तर भागातील सिन्नर - सायखेडा रस्त्यावरील निसर्ग संपन्न असलेल्या नायगाव घाटाचे सौंदर्य गेल्या काही दिवसांपासून धोक्यात आले आहे. येथे माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील काही कारखाने वाया जाणारे साहित्य या घाटाच्या परिसरात टाकत आहे. तसेच इतर ठिकाणाहून अनेकजण येथे सर्रासपणे कचरा टाकत असल्याचा प्रकार नजरेस पडत आहे. सुमारे दिड किलोमीटर अंतराचा घाट परिसर गवत तसेच विविध रानफुलांनी नटलेला आहे. डोंगराच्या कुशीतुन नागमोडी वळणे घेत प्रवाशांना विशेषत: लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या निसर्ग संपन्न घाटाचा सध्या कचरा डेपो बनत चालल्यामुळे नायगाव खो-यासह इतर ठिकाणच्या प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. देशासह राज्यात एकीकडे स्वच्छतेचे वारे वाहत असतांना निसर्गाने नटलेल्या घाटाचे कच-या बरोबर दुर्गंधीमुळे मोठे नुकसान होत आहे. काही दिवसांपासून प्लास्टिक, चुना, कागदाचे तुकडे, स्टीकर आदीसह विविध प्रकारचा कचरा तसेच दुर्गंधीयुक्त केमिकल या घाटातील रस्त्याच्या कडेला सर्रास टाकला जात आहे.