तीन गावांचा पाणीपुरवठा धोक्यात : एकाच ठिकाणी ५० नळ कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:34 AM2018-06-05T00:34:22+5:302018-06-05T00:34:22+5:30
पिंपळगाव, दाढेगाव, वडनेर या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनवर एकाच ठिकाणी तब्बल ५० नळ कनेक्शन करण्यात आल्याने या तीनही गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात असून, हा प्रकार कोणाच्या कृपेने झाला याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
इंदिरानगर : पिंपळगाव, दाढेगाव, वडनेर या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनवर एकाच ठिकाणी तब्बल ५० नळ कनेक्शन करण्यात आल्याने या तीनही गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात असून, हा प्रकार कोणाच्या कृपेने झाला याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील भवानीमाता जलकुंभापासून पिंपळगाव खांब, दाढेगाव व वडनेर या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १२ इंची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. या लाइनवरून ५० नळजोडण्या एकाच दिवसात करण्यात आल्या. त्यासाठी मुख्य पाइपलाइनपासून प्रबुद्धनगरपर्यंत अर्धा कि.मी. लांबीचा खड्डा जेसीबीच्या साहाय्याने करून त्यातून पाइपलाइन टाकण्यात आल्या. मुख्य पाइपलाइनवरून ४ इंची किंवा ६ इंची कनेक्शन करून त्यावरून नळ फिटिंग करणे आवश्यक असताना १२ इंची मुख्य पाईपलाच ५० नळजोडण्या देण्यात आल्याने आश्चर्ययुक्त संताप व्यक्त करण्यात येत असून, यामुळे तीनही गावांतील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. सदर मुख्य पाइपलाइन तिन्ही गावांना पाणीपुरवठा करण्यासाठीच असताना त्यावरून कोणाच्या वरदहस्ताने नळजोडण्या देण्यात आल्या याचा खुलासा मनपा प्रशासनाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.