धोकादायक वाडा मनपाला ओळखताच आला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 12:56 AM2018-08-07T00:56:50+5:302018-08-07T00:57:14+5:30
महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुने नाशिक, पंचवटी भागांत धोकादायक वाडे, घरांना नोटिसा बजावण्याची मोहीम हाती घेत कागदी घोडे नाचविले जातात; मात्र या नोटिसा नेमक्या कोणत्या निकषांच्या आधारे मनपा विभागीय कार्यालय व नगररचना बजावते हा विषय खरं तर संशोधनाचा म्हणावा लागेल.
नाशिक : महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जुने नाशिक, पंचवटी भागांत धोकादायक वाडे, घरांना नोटिसा बजावण्याची मोहीम हाती घेत कागदी घोडे नाचविले जातात; मात्र या नोटिसा नेमक्या कोणत्या निकषांच्या आधारे मनपा विभागीय कार्यालय व नगररचना बजावते हा विषय खरं तर संशोधनाचा म्हणावा लागेल. कारण रविवारी जुन्या नाशकातील प्रभाग क्रमांक १३मधील घर क्रमांक १८५५ असलेला काळेवाडा महापालिकेने कधी धोकादायक ठरविलेलाच नव्हता. हा वाडा धोकादायक असल्याची ओळख प्रशासनाला पटलीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जुने नाशिकमधील प्रभाग १३ हा पश्चिम विभागाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे. या प्रभागात सर्वाधिक गावठाणचा भाग असून पावसाळ्यापूर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागातील जवळपास १३० घरांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच पूर्व विभागातील जुन्या नाशकातील प्रभाग १४मध्ये निम्म्यापेक्षा अधिक गावठाणचा परिसर असून, या भागातील ४५ धोकादायक झालेल्या घरांना नोटिसा देण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. जवळपास जुन्या नाशकातील १७५ घरे महापालिकेने धोकादायक ठरविली आहेत. धोकादायक ठरविताना महापालिके च्या संबंधित अधिकाºयांकडून वाड्याची अवस्था बाहेरून तपासली जाते आणि त्याअधारे संबंधित मालकाला नोटीस दिली जाते; काळे वाड्याच्या बाबतही असेच काहीसे घडले असावे. कारण काळे वाड्याचा रस्त्यावरून दिसणारा उंबरठ्याचा दर्शनी भाग आजही शाबूत व सुस्थितीत असल्याचे दिसते. त्यामुळे रस्त्यावरून जाणाºया नव्या पादचाºयाला हा वाडा आतमध्ये कोसळलेला असेल अशी साधी शंकाही येणार नाही. वस्तुस्थिती वेगळीच होती. वाड्याच्या आतमधील मागील बांधकाम पूर्णत: जीर्ण झालेले होते. त्यामुळे माती ढासळून वाडा कोसळला आणि दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वाडे तपासणीचे निकष बदलावे लागणार
केवळ बाहेरून सुस्थितीत लाकडी नक्षीकाम किंवा बांधकाम दिसते म्हणून वाडा सुरक्षित आहे, हा गैरसमज प्रशासनाला दूर करावा लागणार आहे. यासाठी धोकादायक वाडे, घरांचे सर्वेक्षण करताना संबंधित यंत्रणेला तपासणीचे निकष बदलावे लागणार आहे. कारण
‘काळे वाड्या’सारखे जुन्या नाशकात अजून वाडे असू शकतात की जे बाहेरून बघताना सुरक्षित वाटतात; मात्र आतील बाजूने बांधकाम हे पूर्णत: जीर्ण झालेले आहे.
वाद थांबवा; सुरक्षा भक्कम करा
जुन्या नाशकातील पडक्या वाड्यांची अवस्था बिकट आहे, हे सर्वश्रुत आहे. जुने नाशिककरदेखील हे जाणून आहे. महापालिका प्रशासनही याबाबत अनभिज्ञ नाही; मात्र वाडामालक-भाडेकरू हा वाद समस्याचे निराकरण करण्यामधील मोठा अडसर ठरत आला आहे. हा वाद आपापसांत सामंजस्याने मिटवून संबंधितांनी आपली आणि परिसराची सुरक्षा भक्कम करण्याचा प्रयत्न करायला हवा. पडीक वाडे जेथे कोणीही राहत नाही, ते संबंधित मालकांनी तातडीने महापालिके कडे पत्र देऊन उतरवून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आजूबाजूच्या रहिवाशांचा जीव धोक्यात येणार नाही.