धक्कादायक : सैनिकी शिक्षण देणाऱ्या शाळेत चार विद्यार्थिनींचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 10:57 PM2019-03-23T22:57:15+5:302019-03-23T22:57:56+5:30
अल्पवयीन मुलींनी घरी पालकांना ही बाब सांगितल्यानंतर पालकांनी येथील मुख्याध्यापकांच्या सदर प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाला घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.
नाशिक : शहरातील भोसला गर्ल्स हायस्कूलमध्ये अठरा दिवसांपूर्वीच नियुक्त झालेल्या सहायक प्रशिक्षक सेवानिवृत्त सुभेदार मच्छिंद्र कर्पे याने चार अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.२३) रात्री उशिरा उघडकीस आला. याप्रकरणी संशयित कर्पे यास संस्थेने नोकरीवरून काढून टाकले असून, पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोसलाच्या गर्ल्स हायस्कू लमध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतचे वर्ग चालतात. या शाळेत मुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी मेजर, सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्त केले जाते. त्यानुसार १५ फेब्रुवारी रोजी कर्पे यास संस्थेने सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. मुलाखतीदरम्यान, त्यांना संस्थेने सर्व नियम समजावून सांगितल्याचा दावा विश्वस्तांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी घडलेल्या या निंदनीय व लाजीरवाण्या घटनेने भोसला सैनिकी शिक्षण संस्थेला हादरा बसला आहे. अल्पवयीन मुलींनी घरी पालकांना ही बाब सांगितल्यानंतर पालकांनी येथील मुख्याध्यापकांच्या सदर प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी संस्थेच्या विश्वस्त मंडळाला घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. मंडळाने सर्व महिला सदस्यांची ‘विशाखा’ समिती तत्काळ स्थापन केली. यानुसार कर्पे यास बोलावून विश्वस्तांनी जबाब घेण्याचा प्रयत्न केला तसेच विशाखा समितीपुढे हजर रहावे, लागणार असल्याचे बजावले. तत्पूर्वीच कर्पे याने संस्थेकडे आपल्या नोकरीचा राजीनामा सोपविला होता. मात्र ‘विशाखा’ समितीने त्याची कसून चौकशी केली. या चौकशीत कर्पे हा दोषी आढळला. शनिवारी (दि.२३) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संस्थाचालकांना समितीने अहवाल सादर केला. त्यानंतर संस्थाचालकांनी त्वरित गंगापूर पोलीस ठाण्याला घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. अवघ्या काही मिनिटांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्यासह पथक शाळेच्या मध्यवर्ती कार्यालयात पोहचले आणि संशयित कर्पे यास बेड्या ठोकल्या.त्याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलींवर लंैगिक अत्याचार केल्याप्रकरणी विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पोक्सो) रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कम सुरू होते.
--
घडलेली घटना अत्यंत निंदनीय अशीच आहे. चार दिवसांपुर्वी हा प्रकार घडला त्यानंतर पालकांनी ही बाब मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आणून दिली. जेव्हा हा प्रकार आमच्यापर्यंत पोहचला तेव्हा तत्काळ ‘विशाखा’ समितीच्या महिला सदस्यांची नेमणूक करून त्यांच्यामार्फत चौकशी सुरू केली. शनिवारी रात्री आठ वाजता चौकशी पुर्ण झाली व कर्पे हा चौकशीत दोषी आढळला. तत्काळ गंगापूर पोलिसांना माहिती देऊन कर्पे यास पोलिसांच्या स्वाधीन केले. संस्थेने या प्रकारामध्ये कुठलाही पक्षपातीपणा केला नसून निपक्ष चौकशी करत न्याय दिला. अशा पध्दतीचे वर्तन करणाऱ्यांच्या संस्था कधीही पाठीशी राहणार नाही, पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
- डॉ. दिलीप बेलगावकर, सर कार्यवाह