पहाटेही कोसळला वाड्याचा धोकादायक भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 01:37 AM2021-07-05T01:37:06+5:302021-07-05T01:37:29+5:30

देवधर व घनकर लेनच्या कॉर्नरला असलेला सुमारे शंभर वर्षांहूनही अधिक जुना वैश्य वाडा शनिवारी संध्याकाळी अचानकपणे कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. रविवारी (दि.४) पहाटेसुध्दा या वाड्याचा काही धोकादायक झालेला भाग पाठीमागून पुन्हा कोसळल्याचे रहिवाशांनी सांगितले.

Dangerous part of the castle collapsed in the morning | पहाटेही कोसळला वाड्याचा धोकादायक भाग

पहाटेही कोसळला वाड्याचा धोकादायक भाग

Next
ठळक मुद्देअकरा कुटुंबे स्थलांतरित : पोलिसांकडून नगररचना विभागाकडे चौकशी

नाशिक : देवधर व घनकर लेनच्या कॉर्नरला असलेला सुमारे शंभर वर्षांहूनही अधिक जुना वैश्य वाडा शनिवारी संध्याकाळी अचानकपणे कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली. रविवारी (दि.४) पहाटेसुध्दा या वाड्याचा काही धोकादायक झालेला भाग पाठीमागून पुन्हा कोसळल्याचे रहिवाशांनी सांगितले. या वाड्याभोवतालच्या अन्य चारही वाड्यांमधील अकरा कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले होते. रविवार कारंजा परिसराला लागून असलेल्या घनकर लेन, देवधर लेन, सरसुभे लेन हा परिसर आहे. वर्दळीचा व नेहमीच गजबजलेला अशी या भागाची ओळख आहे. अरुंद गल्लीबोळांसह जुने वाडे या भागात पहावयास मिळतात. वाड्यांमध्ये खाली दुकाने आणि वरील मजल्यांवर रहिवाशी भाडेतत्त्वावर राहतात तर काही वाड्यांमध्ये मालकही वास्तव्यास आहेत. देवधर लेन अन सरसुभे लेनच्या मध्यभागी असलेला अजित खेमचंद वैश्य यांचा वाडा पूर्णत: पाठीमागून कोसळला. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नी संगीता वैश्य व सूनबाई रिता वैश्य यादेखील पाठीमागे सुरू असलेल्या इमारतीच्या पायासाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळल्या. आजूबाजूच्या युवकांनी वेळीच धाव घेत मातीच्या ढिगाऱ्यांतून त्यांना बाहेर काढत तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले असून, प्रकृती स्थिर असल्याचे विनोद वैश्य यांनी सांगितले. दरम्यान, या सासू-सुनेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

---इन्फो---

घनकर गल्लीत येणारे रस्ते बंद

बापट, वैश्य, जोशी वाड्यांमधील कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. सरसुभे लेनमधील एका धोकादायक तीन मजली वाड्यांमध्ये मात्र अद्यापही काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. घनकर गल्लीतील देवधर लेनमधील २५ अबालवृद्धांना रविवारपर्यंत स्थलांतरित करण्यात आले होते. पोलिसांनी देवधर लेन आणि घनकर गल्लीत रविवार कारंजाकडून येणारे अंतर्गत रस्ते बॅरिकेडिंग करून बंद केले आहेत.

--इन्फो--

..तर पोलिसांकडून कारवाई

सरकारवाडा पोलिसांकडून मनपाच्या नगररचना विभागाकडे सरसुभे लेन व देवधर लेनच्या मध्यभागी सुरू असलेल्या वाड्याच्या नूतनीकरणाच्या परवानगीबाबत माहिती मागविण्यात आली आहे. येथे जोशी वाडा पाडून त्या जागेवर इमारत उभारणीसाठी आरसीसी पायाभरणीकरिता खोदकाम केले जात आहे. या खोदकामामुळे हादरे बसून वैश्य वाडा कोसळला तर अन्य दुसरे वाडे धोकादायक झाल्याचा आरोप अजित वैश्य यांचे बंधू विनोद वैश्य यांच्यासह अन्य रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, वैश्य यांचा जबाब पोलिसांकडून रविवारी घेण्यात आला आहे. परवानगी जर मनपाकडून मिळाली नसेल तर दोषी वाडामालकावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Dangerous part of the castle collapsed in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.