धोकादायक कठड्याला लावले बॅरिकेड्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:48 AM2019-09-26T00:48:59+5:302019-09-26T00:49:29+5:30
गेल्या महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठालगतच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी गेल्याने नदीकाठ परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तर नदीकाठालगत प्रशासनाने उभारलेल्या संरक्षक जाळ्या तसेच संरक्षित भिंत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नदीपात्राचा धोकादायक कथडा उघडा पडला आहे.
पंचवटी : गेल्या महिन्यात गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठालगतच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी गेल्याने नदीकाठ परिसरात राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तर नदीकाठालगत प्रशासनाने उभारलेल्या संरक्षक जाळ्या तसेच संरक्षित भिंत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नदीपात्राचा धोकादायक कथडा उघडा पडला आहे. सध्या या धोकादायक कठड्याभोवती पोलीस प्रशासनाने बंदोबस्त तसेच नाकाबंदीसाठी रस्त्यावर उभे करण्यासाठी ठेवलेले लोखंडी बॅरिकेड संरक्षित भिंतीचे काम करत असल्याचे दिसून येते.
घारपुरे घाटावर असलेल्या गोदावरी नदीपात्रालगत गेल्या काही दिवसांपासून लोखंडी बॅरिकेडिंग केलेले असले तरी अशोकस्तंभ जनावरांच्या दवाखान्याकडून वेगाने दुचाकी किंवा चारचाकी आल्यास आणि वाहनाचा वेग नियंत्रित न झाल्यास वाहन थेट नदीपात्रात कोसळून अपघाताची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून घारपुरे घाटानजीक नदीपात्रालगत अर्धवट तुटलेल्या भिंत तसेच संरक्षित जाळ्या असल्या तरी वाहनधारक तसेच परिसरात खेळणाºया लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अजब शक्कल लढवित पोलीस प्रशासनाच्या लोखंडी बॅरिकेडिंगचा आधार घेतला आहे. याठिकाणी जाळ्या लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
लोखंडी जाळ्यांची गरज
घारपुरे घाटानजीकच्या नदीपात्रालगत काठाजवळ तीन ते चार लोखंडी बॅरिकेडिंग उभे केलेले असल्याचे बघायला मिळते. प्रशासनाने या ठिकाणच्या नदीकाठाची पाहणी करून तत्काळ पुन्हा नव्याने लोखंडी जाळ्यांची संरक्षित भिंत उभी करणे सध्या तरी गरजेचे ठरणार आहे.