घाटातील धोकादायक वळण रस्त्याला टिपड्यांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 07:36 PM2018-08-14T19:36:55+5:302018-08-14T19:40:54+5:30
आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेल्यानंतर महाराष्ट्रभर प्रशासन सतर्कझाले. नाशिक-गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाटातील धोकादायक वळणाचे संबंधित यंत्रणेला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
पेठ : आंबेनळी घाटात झालेल्या दुर्घटनेत ३३ जणांचा बळी गेल्यानंतर महाराष्ट्रभर प्रशासन सतर्कझाले. नाशिक-गुजरात राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाटातील धोकादायक वळणाचे संबंधित यंत्रणेला कोणतेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. या धोकादायक वळणावर चक्क लोखंडी टिपड्यांना प्लॅस्टिकच्या पट्ट्या बांधून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याने अशा प्रकारची उपाययोजना अपघात कसे रोखू शकेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकपासून पेठकडे जाताना दिंडोरी व पेठ तालुक्याच्या सीमारेषेवर सावळघाट आहे. एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने या घाटातून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. घाटाच्या संरक्षक भिंती ढासळल्या आहेत. अनेक वळणांवर धोकादायक स्थिती निर्माण झाली असताना घाटाच्या मध्यभागी एका अवघड वळणावर दरीच्या दिशेने संरक्षक कठडाच नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित यंत्रणेने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला लोखंडी टिपडे ठेवून त्याला दोरी बांधून तात्पुरती मलमपट्टी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
दिशादर्शक फलक झाले गायब
सावळघाट सुरू होतानाच तीव्र वळण असल्याने रात्रीच्या अंधारात व दाट धुक्यात हे वळण दिसत नसल्याने वाहने सरळ जाऊन आदळतात. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक फलक नसल्याने वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मध्यंतरी घाटात लावलेल्या दिशादर्शक फलकांवर चक्क गणपतीच्या रेडियम प्रतिमा चिटकविण्याची किमया प्रशासनाकडून करण्यात आली होती. यावर भाविकांनी आक्षेप नोंदविल्याने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन अशा प्रतिमा काढून टाकण्यात आल्या असल्या तरी त्यानंतर त्यावर रेडियम लावले नसल्याने अपघाताला आमंत्रण देण्याची वेळ आली आहे.