नाशिकमध्ये मुलांच्या दप्तरात आढळली गुप्ती, कोयता अन् चॉपरसारखी घातक हत्यारे
By अझहर शेख | Published: March 27, 2024 05:23 PM2024-03-27T17:23:43+5:302024-03-27T17:25:04+5:30
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत शस्त्रधारींविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अझहर शेख, नाशिक : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत शस्त्रधारींविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील चार महिन्यांमध्ये नाशिक शहर पोलिसांनी वेगवेगळ्या भागात बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांना ताब्यात घेत दणका दिला. विशेष म्हणजे पंचवटी, घारपुरे घाट परिसरात दाेघा शाळकरी मुलांच्या दप्तरामध्ये घातक शस्त्रेही पोलिसांना आढळून आली आहेत. मागील चार महिन्यांत नाशिक शहर पोलिसांनी एकुण १४ देशी पिस्तुल, २०काडतुसे, ३१कोयते आणि ११ तलवारी अशी घातक हत्यारे जप्त केली आहेत.
नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व पोलिस ठाणे प्रमुखांसह गुन्हे शाखा युनिट-१ व २ तसेच विशेष पथक, गुंडाविरोधी पथकांच्या प्रमुखांनाही हत्यारे बाळगणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार सर्व पोलिस ठाण्यांच्याा हद्दीत शस्त्रधारींविरूद्ध धडक कारवाई मागील काही महिन्यांपासून सुरू करण्यात आली आहे. गेल्या पंधरवड्यापासून या कारवाईला अधिक वेग आला आहे. आगामी निवडणूका डोळ्यांपुढे ठेवून नाशिक शहर पोलिसांकडून कायदासुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारांविरूद्ध मोर्चा उघडण्यात आला आहे. तडीपार, हद्दपार गुंडांसह शस्त्रे बाळगणाऱ्यांना ताब्यात घेत कारवाई केली जात आहे. जेणेकरून कोठेही कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही हा त्यामागील उद्देश असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले.
समाजकंटकांना शिकविला धडा...
नाशिक शहरात विविध उपनगरांमध्ये कोयते, तलवारी, चॉपरसारख्या हत्याराने हल्ले करण्यात आल्याच्या घटना मागील काही दिवसांमध्ये घडल्या होत्या. तसेच समाजकंटकांनी वाहनांचीसुद्धा अशाप्रकारे हत्यारांनी तोडफोड केल्याच्या काही घटना घडल्या होत्या. अशाप्रकारे दहशत माजविणाऱ्या समाजकंटकांना धडा शिकविण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे.
स्कुलबॅगमध्ये सापडले तीन चॉपर -
गोदापार्क चिंचबन परिसरात एका अल्पवयीन मुलाला गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या साध्या वेशातील पोलिस पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या स्कुल बॅगची झडती घेतली असता बॅगेत ३ चॉपर आढळून आले. तसेच घारपुरे घाट याठिकाणीही एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळील स्कुल बॅगमध्ये १ कोयता, २ चॉपर अशी घातक शस्त्रे मिळून आली आहेत.
गुप्ती, चॉपर मिरवणारा बालक ताब्यात -
पंचवटी भागातील क्रांतीनगरमधील मनपा उद्यानाजवळ गुप्ती, चॉपरसारखे हत्यारे घेऊन मिरविणाऱ्या विधीसंघर्षित बालकाला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्या अंगझडतीमध्ये १गुप्ती, २ चॉपर असे प्राणघातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.