डेंग्यूचा डंख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 04:07 PM2017-11-05T16:07:14+5:302017-11-05T16:07:35+5:30
आकडेवारी आणि तुलनेत जेव्हा यंत्रणा अडकते किंवा त्यातील अनुकूलतेच्या आधारे बचावाच्या भूमिकेत शिरते, तेव्हा मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष घडून आल्याशिवाय राहत नाही. नाशकात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढल्याच्या प्रकाराबाबतही तसेच काहीसे होताना दिसत आहे, हे दुर्दैवी म्हणायला हवे.
आकडेवारी आणि तुलनेत जेव्हा यंत्रणा अडकते किंवा त्यातील अनुकूलतेच्या आधारे बचावाच्या भूमिकेत शिरते, तेव्हा मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष घडून आल्याशिवाय राहत नाही. नाशकात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढल्याच्या प्रकाराबाबतही तसेच काहीसे होताना दिसत आहे, हे दुर्दैवी म्हणायला हवे.
नाशकात भीती वाटावी अशा प्रमाणात डेंग्यूचा फैलाव होताना दिसत आहे. चालू वर्षाच्या प्रारंभीच्या काही महिन्यांमध्ये प्रतिमाह अवघी २ ते ६ इतकीच राहिलेली या आजाराच्या रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांत थेट शंभरावर पोहोचली आहे. यातही आॅक्टोबरमध्ये या वर्षातील सर्वाधिक १४३ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. जानेवारीपासून आजपर्यंतचा आढावा घेता या चालू वर्षात एक हजारावर संशयित रुग्ण आढळले असून, त्यातील सुमारे चारशे जणांना डेंग्यू झाल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले आहे. ही आकडेवारी खरे तर चिंताजनक आहे. विशेषत: नाशिक पूर्व व सिडको-सातपूरमधले डेंग्यूचे प्रमाण अधिक असून, सिडकोत तर एकाच परिसरात पन्नासपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत, कारण तेथील एका बंद पडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातून महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची कुचराई उघड होणारी आहे. म्हणायला कागदोपत्री तिसेक धूर फवारणी यंत्रांद्वारे धुरळणी केली जाते. परंतु ती पुरेशी आहे का व उपयोगी ठरते आहे का याचा आढावाच घेतला जाताना दिसत नाही. आजही अनेक भागातून त्याबाबतच्या तक्रारी येताना दिसतात. धूर फवारणी करणारे कर्मचारी कामचुकारपणा करतात, त्यांच्यावर कारवाईची मागणीही होते; पण त्याबाबतही काही होताना दिसत नाही. त्याउलट महापालिकेची यंत्रणा गेल्यावर्षीपेक्षा यंदा स्थिती कशी आटोक्यात आहे, हे सांगण्यात धन्यता मानताना दिसते. गेल्यावर्षी आॅक्टोबरपर्यंत सातशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले होते, यंदा ती संख्या चारशेच आहे. शिवाय गेल्यावर्षी चारजण मृत्युमुखी पडले होते, यंदा तसे काही घडलेले नाही, असे म्हणून यंत्रणा याबाबतीतले गांभीर्य बाळगताना दिसत नाही. दुपारी उन्हाचा चटका बसतो व सायंकाळनंतर थंडी वाजते, या वातावरणात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढते, असे कारण देऊनही बचावण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा जबाबदारीपासून बचावाची कारणे शोधण्यापेक्षा ती निभावण्याची भूमिका महापालिकेतील आरोग्य विभागाने घेणे गरजेचे आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यूबाधितांचे प्रमाण कमी आहे, ही बाब कागदोपत्री समाधानाची मानली जात असली तरी, ते समाधान समस्येकडे दुर्लक्ष घडविणारे तसेच त्यासंबंधाने होत असलेल्या कुचराईला निमंत्रण देणारेही ठरते. आकडा कमी म्हणून अशा प्रश्नांकडे पाठ फिरवता येणार नाही. दुर्दैव असे की, महापालिकेतील आरोग्य विभाग नेतृत्वबदलाच्या प्रक्रियेत गुरफटलेला आहे. त्यामुळे यंत्रणा बेफिकिरीने काम करताना दिसते. डेंग्यूप्रमाणेच कावीळ व मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दूषित पाणीपुरवठ्यातून ही बिमारी ओढवते आहे. पण, त्याहीबाबत अनास्थेचीच स्थिती आहे. नागरिक स्वत:च्या आरोग्याबद्दल तितकेसे सजग नाहीत हा भाग आहेच; परंतु आरोग्यविषयक समस्यांना बºयाचअंशी महापालिकेच्या यंत्रणांचे दुर्लक्षही कारणीभूत ठरताना दिसून येते. म्हणूनच याकडे गांभीर्याने लक्ष पुरविले जाणे गरजेचे आहे.