निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
By Admin | Published: March 22, 2017 01:28 AM2017-03-22T01:28:13+5:302017-03-22T01:28:34+5:30
नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्त कर्मचारी प्रवास सवलतीच्या पासची मागणी करीत असून, अद्यापही हा प्रश्न सोडविण्यात आलेल्या नाही.
नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून निवृत्त कर्मचारी प्रवास सवलतीच्या पासची मागणी करीत असून, अद्यापही हा प्रश्न सोडविण्यात आलेल्या नाही. प्रलंबित विविध १४ प्रश्नांसाठी मंगळवारी एन. डी. पटेलरोड येथे एसटी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यात एकाच वेळी अशाच प्रकारे निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यासंदर्भात संघटनेने म्हटले आहे की, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत गेल्यावर्षी सरकारला नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर शासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णयही दिले. त्या निर्णयांचे परिपत्रक काढण्याचे आदेशही त्याचवेळी देण्यात आले होते. कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतील व मुंबईमधील बीई एस.टी. या संस्थेने कोणत्या प्रकारे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बस पास दिला जातो, याची माहिती घेऊन निर्णय घेतला जाईल, असेदेखील आश्वासन शासनाने दिले होते. या आश्वासनांना आता सहा महिने होऊन गेले आहेत. मात्र अजून एकाही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे संघटनेमध्ये तीव्र नाराजी आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विभागीय कार्यालयासमोर एकाच वेळी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विभागीय अध्यक्ष अशोक रांगणेकर, विश्वनाथ पुजारी, सुधाकर गुजराथी, राजाभाऊ जाधव, अनंत भालेराव आदिंसह जिल्हयातील निवृत्त एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)