नाशिकच्या आर्टिलरी रोडवर अंधाराचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:43 AM2018-01-19T11:43:31+5:302018-01-19T11:48:34+5:30
नाशिकरोड : आर्टिलरी सेंटर रोडवर दुभाजकांमध्ये पथदीप उभारण्याच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सायंकाळनंतर रहिवासी, वाहनधारक यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
आर्टिलरी सेंटर रोडवर दीड-दोन वर्षांपूर्वी मनपाकडून रस्ता दुभाजक बनविण्यात आले आहे. दुभाजकामध्ये ठिकठिकाणी पथदीप लावण्यासाठी जागादेखील सोडण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेले बहुतांश पथदीप बंद पडले आहेत.
तर इतर सुरू असलेले काही पथदीप झाडांच्या फांद्यांमध्ये लपून गेले आहेत. यामुळे सायंकाळनंतर आर्टिलरी सेंटर रोडवर अंधाराचे साम्राज्य पसरते. जैन भवन ते सुराणा हॉस्पिटलपर्यंतचे दुभाजकांमध्ये लावलेले पथदीपदेखील झाडांच्या फांद्यात लपून गेले आहेत.
मनपा विद्युत विभागाकडून पथदीप लावण्याचे टेंडर मंजूर झाल्याचे गेल्या अनेक महिन्यांपासून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात एलइडी पथदीप लावण्याचा मुहूर्त काही लागत नाही. याकडे प्रभागाचे नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. त्याचा त्रास मात्र परिसरातील रहिवासी, व्यापारी व वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर वेड्यावाकड्या पसरलेल्या झाडाच्या फांद्या उद्यान विभागाकडून तोडण्यात येऊन दुभाजकामधील पथदीपाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.