नायगाव खोऱ्यात अंधाराचे साम्राज्य
By admin | Published: June 16, 2014 12:46 AM2014-06-16T00:46:43+5:302014-06-16T01:04:09+5:30
नायगाव खोऱ्यात अंधाराचे साम्राज्य
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून भारनियमनाच्या नावाखाली अतिरिक्त वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र त्यांना आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीही मिळाले नाही.
वीज मंडळाच्या अतिरिक्त भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसाने विजेच्या खांबासह तुटलेल्या विद्युत वाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगण्यात आले. त्यांची दुरुस्ती करण्यात आली; मात्र भारनियमनात काहीही सुधारणा झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
परिसरातील विहिरींना पाणी नसल्याने कृषिपंपाचा वीज वापर होत नसतानाही कमी वीज मागणीच्या काळातही अतिरिक्त भारनियमन सुरु केले आहे. वीज कंपनीने ठरवून दिलेल्या भारनियमनाच्या व्यतिरिक्तही वीजपुरवठा सतत खंडित केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून भारनियमनाव्यतिरिक्त थ्रीफेज वीजपुरवठा कधी दोन तास, तर कधी तासभर खंडित केला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. खंडित होणाऱ्या थ्रीफेज वीजपुरवठ्याचा इतर गावांना फारसा फटका बसत नसला तरी गोदावरी नदीकाठच्या गावांना पिकांना पाणी देता येत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ज्या भागात थोड्या फार प्रमाणात विहिरींना पाणी आहे. त्या गावातील शेतकरी जनावरांना पिण्याचे पाणी काढण्यासाठीच वीजपंप सुरू करतात मात्र विस्कळीत होणाऱ्या वीजपुरवठ्याने शेतकऱ्यांना जनावरांसाठी पिण्याचे पाणी काढण्यासाठी हाल होत आहे. (वार्ताहर)