दारणाचे पाणी थांबवले; ३५ टक्के तुटीची भीती
By श्याम बागुल | Published: November 5, 2018 06:47 PM2018-11-05T18:47:01+5:302018-11-05T18:49:10+5:30
नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते
नाशिक : जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला दारणा धरणाचा विसर्ग सोमवारी सायंकाळी थांबविण्यात आला. नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यासाठी ८.९ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या निर्णयाने सदरचे पाणी सोडण्यात आले असले तरी, वाहनातील तूट लक्षात घेता जायकवाडीपर्यंत फक्त ६५ टक्केच पाणी पोहोचल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नाशिक व नगर जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती असतानाही गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निर्णयानुसार नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणातून पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध दोन्ही जिल्ह्यांमध्ये आंदोलने होऊन प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. परंतु अखेर न्यायालयाच्या निर्णयानुसार पाणी सोडणे भाग पडले. गुरुवार १ आॅक्टोबरपासून नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून पाणी सोडण्यात आले, परंतु गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास महामंडळाने स्थगिती दिल्याने नाशिक जिल्ह्यातून सोडावयाचे ३.१४ टीएमसी पाणी दारणा धरणातूनच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी भावली व मुकणे धरणांतून दारणा धरणात पाणी सोडण्यात आले. मराठवाड्यासाठी पाणी सोडत असताना या पाण्याची चोरी टाळण्यासाठी गोदावरीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तसेच कोल्हापूर बंधाऱ्यांचे निडल्स काढून जागोजागी पोलीस बंदोबस्तात पहारा देण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून गेल्या पाच दिवसांत ३.१४ टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर सोमवारी सायंकाळी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान, पाण्याच्या वहनातील तूट व जागोजागी कोल्हापूर बंधाºयात फळ्या टाकून पाणी अडविण्याच्या प्रकारामुळे नगर व नाशिक जिल्ह्यांतून ८.९ टीएमसी पाणी सोडण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात जायकवाडीत त्यापैकी जेमतेम ६५ टक्केच पाणी पोहोचू शकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ३५ टक्के पाण्याची वहनात गळती व काही ठिकाणी पाण्याची चोरी झाल्याचा संशय आहे.