दारणाकाठ भयमुक्त : जाखोरी, राहुरीत दोन बिबटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 03:18 PM2020-08-05T15:18:28+5:302020-08-05T15:19:59+5:30
राहुरीत जेरबंद झालेला नर बिबट्याही बोरिवलीला रवाना करण्यात येणार आहे. जे नर बिबटे जेरबंद झाले आहेत, त्यांचे डीएनए अहवाल तपासणीसाठी पुन्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
नाशिक : पश्चिम वनविभागाकडून मागील महिनाभरापासून युध्दपातळीवर दारणानदीच्या खोऱ्यालगत वसलेल्या नाशिक तालुक्याच्या पुर्व भागातील गावांमध्ये बिबटे जेरबंद करण्याची मोहीम राबविली जात आहे. बुधवारी (दि.५) पहाटे जाखोरी, राहुरी या दोन गावांमध्ये एक प्रौढ नर व मादी बिबट्या पिंज-यात अडकला. महिनाभरात या भागात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांचा आकडा आता दहा झाला आहे.
दारणा नदीकाठालगत २ जुलैपासून वनविभागाने बिबटे जेरबंद करण्याची मोहीम हाती घेतली. दोनवाडे पासून ते बाभळेश्वरपर्यंत वीस पिंजरे आणि ३५ ट्रॅप कॅमेरे तैनात करण्यात आले आहे. तेव्हापासून या भागातील विविध गावांमध्ये सातत्याने बिबट्या जेरबंद होत आहे. बुधवारी पहाटे जाखोरीत दराडे यांच्या शेतात लावलेल्या पिंज-यात प्रौढ मादी जेरबंद झाली. तसेच राहुरी गावात निवृत्ती सांगळे यांच्या पेरूच्या बागेत लावलेल्या पिंज-यात पहाटेच्या सुमारा अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाचा नर बिबट्या अडकला. घटनेची माहिती मिळताच वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे, विजय पाटील, प्रवीण राठोड यांनी धाव घेत जेरबंद झालेल्या बिबट्यांचे पिंजरे सुरक्षितरित्या हलविले.
...म्हणून नर बिबटे बोरिवलीला कैदेत
दारणाकाठालगतच्या जेरबंद केलेले प्रौढ नर बिबटे बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानात पिंजराबंद ठेवण्यात येत आहे. अद्याप पाच बिबटे या उद्यानात नाशिकमधून रवाना झाले आहेत. हैदराबाद येथील पेशी व आण्विक जीवशास्त्र (सीसीएमबी) प्रयोगशाळेच्या प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार मानवी हल्ले करत ठार मारणारा बिबट्या नर असल्याचा निष्कर्ष काढला आहे. राहुरीत जेरबंद झालेला नर बिबट्याही बोरिवलीला रवाना करण्यात येणार आहे. जे नर बिबटे जेरबंद झाले आहेत, त्यांचे डीएनए अहवाल तपासणीसाठी पुन्हा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार पडताळणी करत बिबट्या नरभक्षक झाला आहे किंवा नाही? हे ठरविले जाणार आहे.