मृत कोरोनाबाधित महिलेवर मुस्लीम तरुणांनी केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 05:06 PM2021-04-18T17:06:47+5:302021-04-18T17:08:12+5:30
सटाणा : तालुक्यातील जायखेडा येथील वयोवृद्ध हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर अंत्यविधीसाठी मुस्लीम समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन हिंदू-मुस्लीम एकोप्याचे अनोखे दर्शन घडविले. आजच्या बिकट परिस्थितीत या महिलेच्या एकुलत्या मुलाच्या मदतीला धावून जात त्याला आधार तर दिला, शिवाय हिंदूधर्माच्या पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.

कोरोनाच्या दहशतीमुळे व खबरदारीमुळे अंत्यविधीला शेजारीपाजारी सोडाच जवळच्या नातेवाइकांनादेखील बंधने येत आहेत. माणुसकी, कर्तव्य या गोष्टींना तिलांजली देण्याची दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे. अशा कटूप्रसंगी काही देवदूत मदतीला धावून जात असल्याने अंत्ययात्रा सुलभ करण्याचा एक प्रयत्न केला जात आहे. जायखेडा येथील ७२ वर्षीय महिलेचे शनिवारी निधन झाले. संचारबंदीमुळे आप्तस्वकियांना अंत्यविधीस येणे अशक्य होते. मात्र, स्थानिक नातेवाइकांनीही याकडे पाठ फिरविली. आईचा अंत्यविधी करण्याचा दुर्दैवी प्रसंग एकट्या मुलावर येऊन ठेपला. मात्र यावेळी मुस्लीम समाजातील मसूद पठाण, फिरोज पठाण, कमिल, अखलाख पठाण, मजहर पठाण, शेरखान पठाण, साखर शेख, मुजाहिद सय्यद, मोसिन शेख, मुसेर पठाण, अरबाज पठाण, सरफराज शहा, जायखेड्याचे पोलीस नाईक सुनील पाटील, राजेश साळवे व ग्रामपंचायत कर्मचारी हरिभाऊ शेवाळे यांनी पुढाकार घेत या महिलेवर अंतिम संस्कार केले. कोरोनामुळे माणसांचा मृत्यू होत असला तरी माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे या तरुणांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला होता.