भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन - बोमन इराणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 06:56 PM2019-01-02T18:56:01+5:302019-01-02T19:02:30+5:30
१३व्या स्काऊट-गाईड ‘बॉस्कोरी’ महासंमेलनाचे. पवित्रता, सुसंवाद अन् आरोग्य अशी संकल्पना या संमेलनाची आहे. या संमेलनासाठी तब्बल २२ राज्यांमधील डॉन बॉस्को स्काऊट-गाईडचे सुमारे साडेचार हजार विद्यार्थी एकत्र येऊन एकात्मतेचा उत्सव साजरा करत आहे.
नाशिक : ‘डॉन बॉस्को’च्या मैदानावर ‘स्काऊट-गाईडच्या बॉस्कोरी’निमित्त भारतातील विविध राज्यांमधील संस्कृतीचे दर्शन घडले. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. विविध राज्यांमधील वेगवेगळ्या भाषा, लोकसंस्कृती या देशाचे वेगळेपण आहे. या महासंमेलनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये अवघ्या भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृती बघता आली, असे मत सिनेअभिनेता बोमन इराणी यांनी व्यक्त केले.
निमित्त होते, ‘डॉन बॉस्को’ संस्थेच्या वतीने शहरात सुरू असलेल्या १३व्या स्काऊट-गाईड ‘बॉस्कोरी’ महासंमेलनाचे. पवित्रता, सुसंवाद अन् आरोग्य अशी संकल्पना या संमेलनाची आहे. या संमेलनासाठी तब्बल २२ राज्यांमधील डॉन बॉस्को स्काऊट-गाईडचे सुमारे साडेचार हजार विद्यार्थी एकत्र येऊन एकात्मतेचा उत्सव साजरा करत आहे. रविवारपासून (दि.३०) हे महासंमेलन कॉलेजरोडवरील डॉन बॉस्कोच्या दिव्यदान मैदानावर सुरू आहे. बुधवारी (दि.२) ‘पवित्रता’ सत्र पार पडले. या सत्राच्या अध्यक्ष महापौर रंजना भानसी, प्रमुख अतिथी म्हणून सिनेअभिनेता बोमन इराणी, संमेलनप्रमुख इयन डाल्टन उपस्थित होते. यावेळी इराणी पुढे म्हणाले, विद्यार्थीदशेतील निरागसता कधीही हरवू देऊ नका, कारण पैसा येत असतो आणि जात असतो; मात्र ही निरागसता, प्रामाणिकता हरविली तर ती पुन्हा मिळविणे शक्य नाही, असा मौलिक सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
सत्राच्या प्रारंभी पश्चिम बंगाल, शिलॉँग, सिक्किम या तीन राज्यांमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक सांस्कृतिक नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जींकली. गुवाहटी, नागालॅँड, शिलॉँग, सिक्कीम, मनिपूर, मिझोराम, आसाम, झारखंड, बिहार, तमिळनाडू, कर्नाटक, ओरिसा, उत्तरप्रदेश, इंफाळ अशा विविध राज्यांमधील विविध जिल्ह्यांमधील डॉन बॉस्को स्काऊट-गाईडच्या शेकडो विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करुन आपल्या राज्यातील लोकवाद्य हाती घेत शांतता फेरीमध्ये सहभागी झाले होते. कॉलेजरोडवरील डॉन बॉस्को शाळेपासून दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास शांतता फेरीला बोमन इराणी यांनी ध्वज दाखवून प्रारंभ केला. कॉलेजरोड, कृषीनगर, कॅनडाकॉर्नर, डोंगरे वसतीगृह, गंगापूररोड, भोसला महाविद्यालयामार्गे गंगापूररोडवरुन पुन्हा डॉन बॉस्कोच्या मैदानावर शांतता फेरीचा समारोप करण्यात आला.
एकता हैं जहां खुशहाली हैं वहा’, ‘ सभी धर्म की एक पुकार एकता को करो साकार’, ‘जो स्वत: सद्भाव बाळगतो, तो सार्वभौमत्वाच्या सामंजस्यात राहतो’, ‘उत्तम आरोग्य हीच धनसंपदा’, ‘युध्द नको शांतता हवी’, ‘विविध जाती-धर्म हाचा देशाचा अभिमान’ अशा समाजप्रबोधनपर घोषवाक्यांचे फलक झळकवित एक दोन नव्हे तर तब्बल २२ राज्यांमधील शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या पारंपरिक पोशाखात रस्त्यावर उतरून भव्य शांतता फे री काढली.