सांडपाण्यामुळे दारणा नदीचे पाणी आरोग्यासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 10:55 PM2020-02-08T22:55:43+5:302020-02-09T00:28:05+5:30

भगूर शहरासह विविध गावांतील शेतीपिके आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान लाभलेल्या दारणा नदीत भगूरसह देवळाली कॅम्प तसेच परिसरातील गावांतील सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदीचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक झाले असून, गोदावरीप्रमाणेच दारणा नदीचीही स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.

Darya River water hazardous for health | सांडपाण्यामुळे दारणा नदीचे पाणी आरोग्यासाठी घातक

भगूर येथील दारणा नदीत नाल्याद्वारे जात असलेले सांडपाणी व तयार झालेले पाण्याचे डबके.

googlenewsNext
ठळक मुद्देजनावरे, पिकांनाही धोका । दूषित पाणी रोखण्याची मागणी

भगूर : भगूर शहरासह विविध गावांतील शेतीपिके आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान लाभलेल्या दारणा नदीत भगूरसह देवळाली कॅम्प तसेच परिसरातील गावांतील सांडपाणी सोडले जात असल्यामुळे नदीचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक झाले असून, गोदावरीप्रमाणेच दारणा नदीचीही स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.
दारणा नदीच्या काठावरील भगूर, राहुरी, दोनवाडे, देवळाली कॅम्प, नानेगाव, संसरी, शेवगे दारणा अशा विविध गावांना वरदान ठरलेल्या दारणा नदीमुळे पिण्याचे पाणी, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नदीच्या पाण्यावर दुतर्फा बागायती पिके घेऊन येथील शेतकरी सुजलाम् सुफलाम् झाला असला तरी, गेल्या काही वर्षांपासून दारणा नदीच्या शुद्धीकरणाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. भगूर नगरपालिका, देवळाली छावणी परिषद आणि लगतच्या ग्रामपंचायती आपल्या गावातील नागरीवस्तीतील घाण, दुर्गंधीयुक्त सांडपाणी विविध नाले, गटारीद्वारे चक्क दारणा नदीच्या पात्रात सोडत असल्याने दारणा नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीच्या पाण्याचा विचित्र वास येत असून, याच पाण्यातून परिसरातील गावांना पाणीपुरवठा केला जात आहे तसेच शेतीपिके व जनावरांनादेखील हेच पाणी दिले जात आहे. सध्या दारणा धरणातून विसर्ग बंद करण्यात आला असून, वाळूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर वाळूचे उत्खनन करून नेल्यामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडून त्यात दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. दरम्यान, दारणा नदीत देवळाली कॅम्पसह बार्न स्कूल, श्ािंगवे बहुला आणि लष्करी वस्तीचे सांडपाणी विजयनगरमार्गे पांढुर्ली रस्त्याने दारणा पुलाखालून नदीत सोडले जाते. तर भगूर शहरातील सांडपाणी राममंदिररोड ते भिलाटी, राजवाडामधून नाल्याद्वारे खुलेआम सोडले जात आहे. त्यामुळे दारणा नदीला अवकळा प्राप्त झाली असून, या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाने दारणा नदीची पाहणी करून पाणी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

गटारगंगेची अवस्था
भगूरच्या दारणा नदीला इतिहास असून, या नदीपात्रात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, स्वातंत्र्य सैनिक नरसिंहराव बलकवडे, भाई प. प. कलंत्री यांच्यासह शेकडो पहिलवान दररोज सकाळी पोहण्याचा सराव करीत. त्यावेळी दारणा नदीचे सौंदर्य व पावित्र्य राखले गेले होते. आता मात्र गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून धरणातून मुबलक पाणी नदीत सोडले जात असल्यामुळेच नदीचे वैभव नष्ट होऊन गटारगंगेची अवस्था आल्याची खंत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Darya River water hazardous for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.