दास रामाचा हनुमंत नाचे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:19 AM2018-04-01T00:19:15+5:302018-04-01T00:19:15+5:30
जिल्ह्यात ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये शनिवारी (दि. ३१) हनुमान जयंतीचे औचित्य साधून हनुमान पालखी, हनुमान जन्मोत्सव, पूजा, अभिषेक, महाप्रसाद वाटप आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम झाले.
नाशिक : जिल्ह्यात ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये शनिवारी (दि. ३१) हनुमान जयंतीचे औचित्य साधून हनुमान पालखी, हनुमान जन्मोत्सव, पूजा, अभिषेक, महाप्रसाद वाटप आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. महाआरतीनंतर दिवसभर भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी सात वाजता १०८ सामूहिक हनुमान चालीसा पठण, नऊ वाजता सुंदरकाण्ड हवन तर दुपारी १ वाजता पूर्णाहूती करण्यात आली.
ओझर येथे शोभायात्रा
ओझर : रामभक्त हनुमान की जय, पवनसुत हनुमानजी की जय, जय बजरंग अशा विविध घोषणांनी ओझरची पहाट उजाडली. निमित्त होते हनुमान जयंतीचे. येथील मारुती वेस येथे असलेल्या हनुमान मंदिरात पहाटे तीन वाजता अभिषेकाला प्रारंभ झाला. अतिशय भक्तीमय वातावरणात झालेल्या उत्सवाचे मानकरी पोपटराव बर्डे होते. पौरोहित्य पंकज पुराणिक यांनी केले. यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत सूर्योदयाच्या वेळेस जन्मोत्सव झाला. यावेळी भाविकांनी फुलांचा वर्षाव केला. सकाळी आठ वाजता मूर्तीची ग्राम प्रदक्षिणा झाली. यावेळी गावातील गल्लोगल्ली महिलांनी सडा संमार्जन करून रांगोळ्या काढल्या होत्या. सर्वात पुढे तुळस डोक्यावर घेतलेल्या महिला, त्यानंतर भजनी मंडळ व मागे हनुमंतरायांची मूर्ती ठेवण्यात आली होती. यावेळी मोठ्या मूर्तीचा डोक्यावरील चांदीचा मुकुट सर्वांचे आकर्षण ठरला. सकाळपासून सुरू झालेली भाविकांची गर्दी दुपारपर्यंत कायम होती. गावातील इतर मंदिरांतदेखील दर्शन घेतले. यावेळी संजय आहेर, भारत रासने, दशरथ शिवले, प्रवीण वाघ, पांडुरंग आहेर, भिकाजी रास्कर, रमेश शिंदे, रु पेश क्षीरसागर, प्रभाकर निकुंभ, दौलत पोटे, श्रावण पोटे, राहुल जंजाळे, रमेश थोरात, अरुण पगार, सुयोग आहेर, तुषार आहेर, राहुल आहेर, कृष्णा आहेर, सुनील कोठावदे, दौलत देवकर, ज्ञानेश्वर शिवले, शंकर शिवले, पुष्पा अक्कर, रत्ना अक्कर, निर्मला अहिरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ, महिला व भजनी मंडळ उपस्थित होते.
लासलगावी अभिषेक
लासलगाव : येथील राम मंदिरात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे अभिषेक करून सहा वाजता राममंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक, टाकळी (विंचूर), निमगाव वाकड, वेळापूर, पाचोरे, मुरळगोई, कोटमगाव रेल्वे स्टेशन यासह परिसरातील गावात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त लासलगावातील राम मंदिरापासून अहल्याबाई चौक, किल्ल्यामागे, गोपाळकृष्ण मंदिर, संत नामदेव मंदिर, शिवाजी चौक व बाजारपेठ या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली.
इगतपुरी येथे शोभायात्रा
इगतपुरी : शहरात हनुमान जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील गुप्ता व्यायामशाळा येथून ढोल ताशाच्या गजरात येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, गुप्ता व्यायामशाळा यांनी शोभायात्रा काढली. ही मिरवणूक शिवाजी चौक, गांधी चौक, जुना मुंबई-आग्रा मार्ग, रेल्वे स्थानक, पटेल चौक, भाजी मंडई आदी भागातून शोभायात्रा काढून गुप्ता व्यायामशाळेत समारोप करण्यात आला. दरम्यान, या मिरवणुकीत लाठी काठी, दांडपट्टा, छडी पट्टा, तलवारबाजी असे विविध पौराणिक खेळ सादर करत नागरिकांना मंत्रमुग्ध केले. गुप्ता व्यायामशाळा व परिसरात विद्युत रोषणाई, पताका, रंगरंगोटी करण्यात आली आहे. पहाटेच्या सुमारास प्रतिमेचे पूजन करून, हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष गोपीनाथ बाबा जाधव, मंडळाचे अध्यक्ष बद्रीनाथ शर्मा, महावीर शर्मा, कमलेश शर्मा, योगेंद्र शर्मा, कांतिलाल राठोड, महेश शिरोळे, शांताराम रिखे, नितीन रिखे, प्रशांत रिखे आदींसह सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ६, ७ व ८ एप्रिल या तीन दिवस भव्य कुस्त्यांची दंगल बारा बंगला परिसरात आयोजित करण्यात आल्याची माहिती हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बद्रीनाथ शर्मा यांनी दिली. वीजवितरण कार्यालयात हनुमान जयंती त्याचप्रमाणे वीजवितरण कार्यालयातील हनुमान मंदिरात जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वीजवितरण कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई-आग्रा महामार्गावरील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, मुंबई-आग्रा महामार्गावरील जुना चेक नाका दक्षिण मुखी हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. पहाटेपासून विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला. जवळपास एक हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंदिराचे विश्वस्त संतोष बैरागी, किशोर बैरागी, गणेश बैरागी उपस्थित होते.
न्यायडोंगरीत सवाद्य मिरवणूक
न्यायडोंगरी : येथे चैत्र पौर्णिमा व हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक भाविक उपस्थित होते. परिसर भजन, वाद्यांनी दणाणून गेला होता. सालाबादप्रमाणे हनुमान मंदिरात पहाटे हनुमान जयंती भजन, आरतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, तर नाना चौकातील हनुमान मंदिर येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला. येथून ध्वजाची गावातून मिरवणूक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली. सर्वप्रथम ध्वज गावातून वाद्यांच्या गजरात मिरवून खंडेराव महाराज मंदिर परिसरात लावण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरेंसह गावातील नागरिक उपस्थित होते. दुसरा ध्वज वाद्यांच्या गजरात मिरवून नाना चौकातील हनुमान मंदिर येथे लावण्यात आला. या मिरवणुकीत माजी पंचायत समिती सभापती विलास आहेर, राजेंद्र आहेर व माजी सरपंच नरेंद्र आहेर यांच्यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.