दसरा-दिवाळीसाठी झेंडूची शेती बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 04:08 PM2018-10-16T16:08:18+5:302018-10-16T16:12:30+5:30
नाशिक : दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेली झेंडूची शेती बहरली असून, पिवळ्या व केशरी रंगाच्या ...
नाशिक : दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेली झेंडूची शेती बहरली असून, पिवळ्या व केशरी रंगाच्या झेंडूची फुले डौलाने उभी असल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे.
एकलहरे परिसरातील गंगावाडी, सामनगाव, कोटमगाव या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली असून, त्यातही शेतक-यांनी ३०७ यलो व मरिन आॅरेंज या जातीच्या झेंडूच्या लागवडीला पसंती दिली आहे. झेंडूचे उत्पादन दीड ते दोन महिन्यात येते. आॅगस्टच्या मध्यावर व सप्टेंबरमध्ये लागवड केलेले झेंडू बरोबर सणासुदीत म्हणजेच दसरा, दिवाळीत बहरून खुडायला येतो. बहुतांशी शेतक-यांनी झेंडूसाठी ड्रिपच्या पाण्याची व्यवस्था केली असून, मशागत, रोपे लागवड, औषध फवारणी, ड्रिप, खुडणी, वाहतूक असा सुमारे लाख रुपये एकरी खर्च येतो. झेंडूचा खुडा दसरा, दिवाळीच्या सुमारास केला जातो. त्यावेळी झेंडूची मागणी वाढलेली असल्याने एका क्रेटमध्ये तीन किलो झेंडू सामावतात. एक क्रेट फुले सुमारे २०० ते २५० रुपयांप्रमाणे विकली जातात. काही ठिकाणी थेट व्यापारीच शेतावर जाऊन ५० रुपये किलोप्रमाणे खरेदी करीत असून, किरकोळ विक्रीसाठी झेंडूची नाशिकरोड, बिटको पॉइंट, शिवाजी पुतळा तसेच नाशिक शहरातील अन्य भागात विक्री केली जाते. तर व्यापारी खरेदी करीत असलेला झेंडू कल्याण व सुरत येथे पाठविला जातो.
सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने झेंडूला चांगली मागणी असल्यामुळे एकरी खर्च वजा जाता ५० ते ७५ हजारापर्यंत फायदा होत असल्याचे शेतकºयांनी सांगितले. मात्र हा पैसा टप्प्याटप्प्याने येत असल्याने लगेचच दुसºया पिकासाठी खर्च होत असल्याने त्याचा फायदा लक्षात येत नसल्याचे शेतकरी सांगतात.