मतदार यादीसाठी तारीख पे तारीख!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:12 AM2018-03-28T00:12:54+5:302018-03-28T00:12:54+5:30
तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी अजूनही ‘तारीख पे तारीख’ सुरू असून, वारंवार मुदतवाढ देऊनही प्रशासनाला अंतिम यादी प्रसिद्ध करता न आल्यामुळे निवडणूक कार्यक्र म पुन्हा पुढे ढकलला आहे.
सटाणा : तालुक्यातील सटाणा व नामपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी अजूनही ‘तारीख पे तारीख’ सुरू असून, वारंवार मुदतवाढ देऊनही प्रशासनाला अंतिम यादी प्रसिद्ध करता न आल्यामुळे निवडणूक कार्यक्र म पुन्हा पुढे ढकलला आहे. तालुक्यातील सटाणा व नामपूर या दोन्ही बाजार समित्यांची निवडणूक होऊ घातली आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणने मतदानाबाबत पणनकडे वेळोवेळी मागितलेल्या मार्गदर्शनास विलंब झाल्यामुळे अंतिम मतदार याद्या तयार करण्याच्या कामासही विलंब होत आहे. गेल्या १२ मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र तरीदेखील यादी प्रसिद्ध न झाल्याने पुन्हा याद्या तयार करण्याच्या कामाला मुदतवाढ देऊन २६ मार्चला अंतिम यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु फेब्रुवारीपासून अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी प्रशासनाचा ‘तारीख पे तारीख’ खेळ सुरूच आहे. मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी शासकीय यंत्रणेला दिलेला कालावधी पुरेसा नसल्यामुळेच मुदतवाढ मागावी लागत असल्याचे बोलले जात आहे. मतदार याद्या अद्याप तयार करण्याच्या कामाला वेळ लागत असल्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास दिरंगाई होत आहे. दरम्यान, मतदार याद्या तयार होऊन प्रसिद्ध करण्यास अजूनही आठ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.
गणासाठीच राहील मतदानाचा अधिकार
पणनने ठरवून दिलेल्या नियमानुसार बाजार समिती क्षेत्रातील गणामधील मतदाराला त्या मतदारसंघापुरतेच मतदान करता येणार आहे. म्हणजे एका मतदाराला एकदाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील घोषित केलेल्या गणांमध्ये खुल्या व आरक्षित केलेल्या जागांवर कोणत्याही गणातील शेतकऱ्याला त्या प्रवर्गानुसार उमेदवारी करता येणार असल्याचे प्राधिकरणने स्पष्ट केले आहे. दोन्ही बाजार समितींच्या साडेतीनशेहून अधिक हरकती निकाली काढल्यानंतर पणनने समाईक सातबारा उताºयावर नावे असलेल्या प्रत्येक शेतकºयाच्या वाट्याला दहा गुंठे क्षेत्र असेल त्यांनाच मतदानाचा हक्क बहाल करण्याच्या सूचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणल्या दिल्यामुळे मतदारांच्या संख्येत दीडपटीने वाढ होणार आहे.