रंगांची उधळण अन् भक्तीचा जल्लोष; रंगी रंगला दत्त पालखी सोहळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:11 PM2022-03-22T22:11:18+5:302022-03-22T22:11:57+5:30
नाशिक - दंडवत.. दंडवत.. प्रऽभु.. सुखदानी.. सुखदानी नामाचा जयघोष... रंगांची उधळण, न्हाऊन निघालेले हजारो भाविक अन् भक्तीचा जल्लोष, अशा ...
नाशिक- दंडवत.. दंडवत.. प्रऽभु.. सुखदानी.. सुखदानी नामाचा जयघोष... रंगांची उधळण, न्हाऊन निघालेले हजारो भाविक अन् भक्तीचा जल्लोष, अशा भक्तिमय वातावरणात रंगपंचमीला देशभरातील महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थ स्थळ असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त पालखी सोहळा उत्तरोउत्तर रंगी रंगला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी दिवसभरात जिल्ह्यासह राज्यभरातील सुमारे पन्नास हजारहुन अधिक भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला आहे. कोरोनाच्या जागतिक संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी भाविकांमध्ये मोठा जल्लोष बघायला मिळाला.
रंगाची यात्रा म्हणून सर्वदूर परिचित असलेली व राज्यातील लाखो महानुभाव पंथीयांचे श्रद्धा स्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त यात्रो उत्सवास रंगपंचमी पासून प्रारंभ झाला. पालखी पुढे उधळणारा रंग हा भाविक प्रसाद म्हणून अंगावर घेतात , अशी येथे श्रद्धा आहे. त्यामुळे हा पालखी सोहळा पाहण्यासाठी व नवस पूर्तीसाठी याठिकाणी राज्यभरातून भाविक दाखल होतात. यंदाही हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महंत मनोहरशास्ञी सुकेणेकरबाबा, अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्ण सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर, गोपीराजशास्त्री सुकेणेकर यांच्या हस्ते देवास विडा अवसर करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत मौजे सुकेणेचे सरपंच सुरेखा चव्हाण, उपसरपंच सचिन मोगल व सर्व सदस्य व ग्रामस्थ तसेच याञा समिती व पोलिस प्रशासन उपस्थित होते.
रंगांची उधळण अन् भक्तीचा जल्लोष; रंगी रंगला दत्त पालखी सोहळा!#Nashikpic.twitter.com/HLOYEMmBxE
— Lokmat (@lokmat) March 22, 2022
महाराष्ट्राच्या विविध भागातून मौजे सुकेणेत दत्त पालखी सोहळयासाठी भाविक उपस्थित होते. चांदोरी व ओणे आणि ओझर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.