कादरभाईंच्या शेतात दर्ग्याबरोबरच दत्ताचे स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 12:29 AM2022-02-22T00:29:26+5:302022-02-22T00:30:09+5:30
जानोरी : एकीकडे धर्मा-धर्मावरून वादविवाद झडत असताना जानोरी, ता. दिंडोरी येथील अब्दुल कादर मोहम्मद फकीर ऊर्फ कादरभाई यांनी आपल्या मालकीच्या शेतात दर्ग्याबरोबरच श्रीदत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविले आहे. कादरभाईंचा हा आदर्श पंचक्रोशीत चर्चेचा विषय बनला आहे.

अब्दुल कादर मोहम्मद फकीर ऊर्फ कादरभाई हे मोहाडी व पंचक्रोशीतील एक सर्वधर्म समभाव जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. गावालगत असणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतजमिनीत बाबा हजरत चांदशावल्ली यांचा दर्गा आहे. तेथे कादरभाई अनेक वर्षांपासून चांदशावल्ली यांच्या संदल बरोबरच नियमितपणे वारकरी संप्रदायाचा कीर्तनाचा कार्यक्रमदेखील स्वखर्चाने आयोजित करतात. गावातही आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ते सक्रिय उपस्थित राहतात. नुकतेच त्यांनी कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची मदत न घेता स्वखर्चाने दर्ग्याचे पुनर्निर्माण व श्रीदत्त मंदिराचे बांधकाम करून प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी जितेशमहाराज शिंपी यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासही गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी सक्रिय सहभाग घेऊन उपस्थिती लावली. या सर्व कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल गोवर्धने यांच्यासह श्रीकृष्ण भजनी मंडळाने सहकार्य केले. कादरभाई यांच्या या धार्मिक सहिष्णू वृत्तीमुळे गावात सर्व जाती-धर्मातील लोकांबरोबर त्यांचे सलोख्याचे व प्रेमाचे संबंध असून, गावात ते आदराचे स्थान आहे.