दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लंपास; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:04 AM2017-07-27T00:04:27+5:302017-07-27T00:04:40+5:30
नाशिक : खते घेण्यासाठी एटीएममधून पैसे काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली रक्कम तिघा संशयितांनी चोरून नेल्याची घटना पेठरोड सिग्नलवर मंगळवारी (दि़ २५) दुपारच्या सुमारास घडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : खते घेण्यासाठी एटीएममधून पैसे काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली रक्कम तिघा संशयितांनी चोरून नेल्याची घटना पेठरोड सिग्नलवर मंगळवारी (दि़ २५) दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे हे तिन्ही चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल शिवलाल घोडे (रा़ मनोली, पोस्ट दरी, ता़ जि़ नाशिक) हे मंगळवारी दुपारी खते घेण्यासाठी नाशिकला आले होते़ महात्मा गांधी रोड सिग्नलवरील सेंट्रल बँक इंडियाच्या एटीएममधून काढलेले ६० हजार रुपये एका बॅगमध्ये ठेवून ती बॅग दुचाकीच्या (एमएच १५, बीके ७८०) डिक्कीत ठेवले़ या ठिकाणापासूनच तीन संशयित त्यांच्या मागावर होते़ पंचवटीत खते घेण्यासाठी निघालेल्या घोडे यांच्यावर संशयितांनी अंगाला खाज येण्याच्या पावडरचा उपयोग केल्यामुळे त्यांना खाज सुटली़ घोडे यांना अॅसिडिटी झाली असे वाटल्याने त्यांनी पेठरोड सिग्नलवरील मेडिकल दुकानासमोर दुचाकी उभी केली व गोळी घेण्यासाठी गेले़ यावेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या या तिघांपैकी दोघांनी नादी लावले तर एकाने डिक्कीतील रोकड असलेली बॅग चोरून नेली़ विशेष म्हणजे हा प्रकार मेडिकल दुकानाशेजारील सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत़