लाचलुचपत विभागातील पोलीस उपअधीक्षकाची महिलेकडून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 06:37 PM2018-09-08T18:37:05+5:302018-09-08T18:39:25+5:30
नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षकाच्या फ्लॅटवर एका महिलेने परस्पर वाढीव गृहकर्ज काढून १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित संत्रा प्रकाश बोथ (रा़ महालक्ष्मी चाळ, पुणे रोड, नाशिक) या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
हेमंत कल्याणराव सोमवंशी (रा. फ्लॅट नंबर १, सुविधी अपार्टमेंट, गंगापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहे़ यापूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्यावे वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या सोमवंशी यांच्या मालकीचा दिंडोरीरोडवरील मधुरम सोसायटीत ९ नंबरचा फ्लॅट आहे़ १ फेब्रुवारी २०११ रोजी संशयित संत्रा बोथ या महिलेने दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक-१ व नाशिक महानगरपालिकेत सोमवंशी यांच्या मालकीचा फ्लॅट स्वत:च्या नावावर नसताना तसेच सोमवंशी यांची कोणतीही संमती न घेता नियोजनबद्ध पद्धतीने व कागदपत्रांच्या आधारे महापालिकेकडून १ लाख ३० हजार रुपयांचे वाढीव गृहकर्ज मिळविले.
विशेष म्हणजे या वाढीव गृहकर्जाचा बोजाही त्यांच्या फ्लॅटवर चढविला़ सोमवंशी यांनी फ्लॅटचा सातबारा उतारा काढला असता मधुरम सोसायटीतील फ्लॅट क्रमांक नऊवर १ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे समोर आले़ कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नसताना ही नोंद कशी झाली याचा तपास केला असता संशयित महिलेने हा प्रकार केल्याचे समोर आले व त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़