दावचवाडीच्या ‘त्या’ विधवेला अखेर मिळाला न्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 09:25 PM2020-06-09T21:25:34+5:302020-06-10T00:11:26+5:30
ओझर : पिंपळगाव बाजार समितीतील मयत कर्मचारी पारस लखिचंद कोचर यांचा सहाव्या वेतन आयोगातील दुसऱ्या हप्त्यातील फरक रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. अखेर सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या मध्यस्थीने शर्मिला कोचर यांना न्याय मिळाला असून, मूळ रक्कम अधिक व्याज असा एकूण रकमेचा धनादेश त्यांना सुपुर्द करण्यात आला.
ओझर : पिंपळगाव बाजार समितीतील मयत कर्मचारी पारस लखिचंद कोचर यांचा सहाव्या वेतन आयोगातील दुसऱ्या हप्त्यातील फरक रक्कम परस्पर लाटल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता. अखेर सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या मध्यस्थीने शर्मिला कोचर यांना न्याय मिळाला असून, मूळ रक्कम अधिक व्याज असा एकूण रकमेचा धनादेश त्यांना सुपुर्द करण्यात आला.
सहाव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जेव्हा वर्ग झाली तेव्हा पारस कोचर हे हयात होते, तर दुसºया हप्त्याची रक्कम वर्ग होण्यापूर्वी त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर अडीच वर्षांचा कालावधी लोटला तरी वारसदार शर्मिला कोचर यांना सदर रक्कम प्राप्त न झाल्याने माजी संचालक गोकुळ गिते यांनी ही अफरातफर उघडकीस आणली होती. बाजार समितीचे सचिव संजय पाटील यांनी सदरची रक्कम मधुकर तेलंगे यांच्या अॅक्सिस बँकेच्या खात्यावर वर्ग करून परस्पर लाटल्याचा आरोप शर्मिला कोचर यांनी केला होता. त्यांनी तसा तक्रार अर्ज सभापती, तालुका सहनिबंधक व पोलीस निरीक्षक पिंपळगाव यांना दिला होता.
या सर्वसंबंधी ‘लोकमत’ने एक आठवडा या प्रकरणाचा बातमीद्वारे पाठपुरावा केला होता. अखेर आमदार दिलीप बनकर यांनी याबाबत तातडीची बैठक घेत चौकशीचे आदेश दिले होते. यात सदर बाब उघडकीस आली. त्यांनी गोकुळ गिते व कोचर परिवारातील काही सदस्यांना बोलवत मध्यस्थी केली व अखेर शर्मिला
कोचर यांना व्याजासकट रक्कम मिळाली.
--------------------------------
...अन् अश्रू अनावर
रोजंदारीवर काम करणाºया शर्मिला कोचर यांची परिस्थिती बेताची आहे. त्यांना जेव्हा सदर प्रकरण समजले तेव्हा त्यांनी बाजार समिती कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु बनकर यांनी मध्यस्थी केल्याने त्यांच्या संसाराला मोठा हातभार लागणार आहे. धनादेश घेऊन त्या बाजार समिती मुख्यालयातून जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना गोकुळ गिते, अजय गवळी आदींनी सावरत आधार दिला.
-------------------------
पिंपळगाव बाजार समितीचा कारभार पारदर्शी आहे. पारस कोचर यांच्या फरक रक्कमेबाबत तोडगा काढला असला तरी अर्जित रजांबाबतदेखील बाळू उगले, पी. एस. जाधव व सीताराम महाजन यांच्या हक्काची रक्कम लवकरच दिली जाईल. विशेष लेखापरीक्षक राजाराम बस्ते यांच्यामार्फत सर्वच बाबींची अंतरिम चौकशी सुरू केली आहे. लवकरच त्यांचा अहवाल प्राप्त होईल. अफरातफर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अजूनही कुणाचे काही देणे-घेणे असल्यास तत्काळ अर्ज द्यावे.
- आमदार दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार समिती