दिवस-रात्र एक करून मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 08:00 PM2021-09-07T20:00:44+5:302021-09-07T20:03:48+5:30
मालेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांसह गणेश विसर्जन मार्गांवर खड्डे पडले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गणेश भक्तांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या शांतता समितीच्या बैठकीत महापालिका प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करीत तक्रारींचा पाऊस पडला होता. मंगळवारी महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी शांतता समितीच्या बैठकीला हजेरी लावत दिवस - रात्र एक करुन येत्या दोन दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन दिले.

याच बैठकीत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरवा, मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी करा. विसर्जनापूर्वी रस्ते खड्डे मुक्त करा. येत्या दोन दिवसात दृश्य स्वरूपात काम दिसले पाहिजे, असे खडे बोल सुनावले. पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात मंगळवारी शांतता समितीची बैठक झाली.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी निकम, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, आयुक्त गोसावी, उपअधीक्षक लता दोंधे, प्रदीप जाधव, मध्यवर्ती गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष केवळ हिरे, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, अग्निशमन दल प्रमुख संजय पवार, पाणीपुरवठा विभागाचे जयपाल त्रिभुवन आदि उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख रामा मिस्तरी यांनी शहरातील रस्ते दुरुस्ती, पथदिप आदि माफक अपेक्षा नागरिकांच्या आहेत. डी. के. कॉर्नर ते टेहरे चौफुली पर्यंतचा रस्ता पोलीस अधीक्षक निवास ते श्रीराम नगर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली.
कैलास तिसगे यांनी कुठल्याही सणाच्या आधी एक महिना आधी शांतता समितीची बैठक घ्यावी. या बैठकीतील सूचनांची अंमलबजावणी करावी. मनपा सण, उत्सव असतील तेव्हाच काम करेल का? असा सवाल उपस्थित केला.
अपर जिल्हाधिकारी निकम यांनी महापालिकेने विसर्जनासाठी तात्पुरते १३ गणेश कुंड उभारावेत, अशी सूचना केली. विसर्जनापूर्वी शहर खड्डे मुक्त करावे, असेही सांगितले. अपर पोलीस अधीक्षक खांडवी म्हणाले की, गुन्हेगार व समाजकंटक म्हणून नोटीसा बजावण्यात आल्या नाहीत. त्याचे कोणी वाईट वाटून घेवू नये. प्रशासकीय बाब म्हणून नोटीसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी, मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो फाईल नेम : ०७ एमएसईपी ०४ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी. समवेत अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे आदि.