आजचा दिवस महत्त्वाचा
By Admin | Published: February 20, 2017 12:19 AM2017-02-20T00:19:26+5:302017-02-20T00:19:43+5:30
प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवण्यासाठी खबरे नियुक्त
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असताना निवडणूक रिंगणातील उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराची कोणतीही कसूर न ठेवता स्वत:ला झोकून देतानाच, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या डावपेच व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी खास खबऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. या खबऱ्यांमार्फत गोपनीय माहिती काढण्याबरोबरच पैसे, वस्तंूच्या वाटपावर लक्ष ठेवण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या काही उमेदवारांनी ‘अभी नही तो कभी नही’ असे समजून इतक्या गंभीरतेने निवडणुकीचा विषय हाताळण्यास सुरुवात केली आहे. प्रभागातून उमेदवारी करताना पॅनलमध्ये कोण असावे, कोण नसावे, प्रतिस्पर्धी कोण आहे याचा अंदाज बांधण्याबरोबरच प्रतिस्पर्ध्यांची बलस्थाने हेरून ते खच्चीकरण करण्याचे प्रयत्न यापूर्वीच करण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस पराकोटीला पोहोचल्याने कोणताही उमेदवार छातीठोकपणे दावा करण्यास पुढे येत नसल्याचे सर्वपक्षीय चित्र आहे. अशा परिस्थितीत जो तो आपल्यापरिने निवडून येण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करीत असून, त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची तयारीही ठेवण्यात आली आहे. काही उमेदवारांकडून पैशांचे वाटप तर काहींनी वस्तूंच्या रूपात भेटी द्यायला सुरुवात केली आहे. काहींनी थेट सोसायट्या, बंगले, इमारती व अपार्टमेंटमधील एकूण मतदारांच्या संख्येत तितक्या खर्चाची कामे करून दिली असून, काही उमेदवारांनी निवडणुकीनंतर सहलींचे आयोजनही केले आहे. (प्रतिनिधी)
एक-एक मताला महत्त्व
महापालिका निवडणुकीत विजयासाठी एकेक मत महत्त्वाचे असून, ते कमावण्यासाठी व न गमविण्यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असताना प्रतिस्पर्ध्यांच्या तंबूत नेमके काय चालले आहे, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे झाले असून, त्यासाठी आपल्यातीलच काहींना प्रतिस्पर्धी गोटात पाठवून माहिती काढण्यात येत आहे, तर काही उमेदवारांनी थेट खबऱ्यांची नेमणूक केली आहे. सोमवारचा दिवस व संपूर्ण रात्र सर्वच उमेदवारांसाठी ‘कत्तल की रात’ ठरणार असल्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या खेळीवर आपली व्यूहरचना करणे सोपे व्हावे यासाठी हे खबरे कमालीचे उपयोगी पडणार आहेत. त्यातल्या त्यात प्रतिस्पर्ध्याकडून पैसे, वस्तूंचे वाटप होत असल्याची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून त्याला अटकाव करणे शक्य होणार आहे.