ओझर येथे दिवसा घरफोडी; सव्वा लाखाचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 01:35 AM2019-12-07T01:35:12+5:302019-12-07T01:35:28+5:30
एका अपार्टमेंटमधील रहिवासी फ्लॅट बंद करून बाहेर गेल्याची संधी साधत दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून ५० हजारांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ओझर येथे भर दुपारी ही घटना घडली.
ओझर टाउनशिप : एका अपार्टमेंटमधील रहिवासी फ्लॅट बंद करून बाहेर गेल्याची संधी साधत दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटातून ५० हजारांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ओझर येथे भर दुपारी ही घटना घडली.
शुक्रवारी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान ओझर येथील अनिल रावसाहेब बोरसे (रा. फ्लॅट नं. १०२, व्हीनस सिल्व्हर अपार्टमेंट, विमलनगर) हे कुलूप लावून पत्नीसह ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेत गेले असताना अज्ञात चोरट्याने फ्लॅटच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट तोडून कपाटातून ५० हजार रु पये रोख रकमेसह ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे, ७ ग्रॅमची चेन व २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही बाब बोरसे यांच्या पत्नी रात्री दहा वाजेला घरी आल्या तेव्हा त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही बाब पती अनिल बोरसे यांना कळविली. बोरसे यांनी चोरी झाल्याची तक्रार रात्री ओझर पोलीस ठाण्यात नोंदविल्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान पोलीस अधीक्षक अरूंधती राणे यांनी सकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली व तपासकामी ओझर पोलिसांना सूचना व मार्गदर्शन केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक जालिंदर चौघुले करीत आहेत.