रखरखत्या उन्हात तडफडणा-या आजीबाईला मायेची सावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:32 PM2019-05-09T18:32:39+5:302019-05-09T18:32:58+5:30
लासलगाव : सेंगऋषी वृद्धाश्रमात केले दाखल
शेखर देसाई, लासलगाव - तापमानाचा वाढता पारा घराबाहेर पडणे मुश्किल करून सोडत असताना रखरखत्या उन्हात लासलगाव जवळील रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या आजीबार्इंना लासलगावचे संजय बिरार आणि नवनाथ सेंगऋषी आश्रमाचे संस्थापक नवनाथ जराड यांच्या माध्यमातून मायेचा आधार मिळाला आणि मानसिक संतुलन ढळलेल्या या आजीबार्इंना दोहोंनी बळजबरीने सेंगऋषी आश्रमात दाखल करून घेत त्यांचा वनवास संपवला.
नाव गाव माहीत नाही. रखरखते ऊन तरीही रस्ता सोडणार नाही अशी जणू भीष्मप्रतिज्ञा केलेल्या आजीबाई गेल्या दीड वर्षांपासून लासलगाव जवळ रस्त्यावर ठाण मांडुन बसलेल्या येणा-या-जाणाऱ्यांना प्रत्येकालाच दिसायच्या. उन-वारा-पाऊस याचा सामना करणा-या या आजीबार्इंना वृद्धाश्रमात दाखल करण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले. परंतु, आजीबाई काही रस्ता सोडायला तयार नसायच्या. कुणी घेऊन जायला आले की आरडाओरड करणे, काठी मारणे, शिव्या देणे यामुळे आजीबाईचा अनेकांना नाद सोडला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रखरखीत उन्हामुळे आजीबाईची स्थिती पाहून अनेकांच्या मनात कालवाकालव झाली. संजय बिरार आणि नवनाथ जराड यांना अनेकांनी फोन करुन आजीबार्इंची अवस्था कळवली आणि त्यांना आश्रमाची किती गरज आहे, याचीही माहिती दिली. आजीबाई एकदम रस्त्यावरच आल्या म्हटल्यावर रात्री-बेरात्री अंधारात अपघाताचाही प्रकार घडू शकतो. त्यामुळे संजय बिरार आणि नवनाथ जराड यांनी मनाचा ठिय्या केला आणि कोणत्याही परिस्थितीत आजीबाईला आश्रमात घेऊन जायचेच असा निर्धार केला. नेहमीप्रमाणे आजीबार्इंनी आरडाओरड केला परंतु, नंतर दम भरल्यावर त्या गाडीत बसायला तयार झाल्या. आजीबार्इंना चालता येत नसल्याने त्यांना उचलूनच गाडीत बसविण्यात आले आणि गाडी आजीबार्इंना घेऊन आश्रमाकडे रवाना झाली. रखरखीत उन्हात तडफडणा-या आजीबार्इंना आश्रमात मायेची सावली लाभली. आजीबाईला आश्रमात आणले तर खरे परंतु, आता त्या आश्रमात किती दिवस राहतात याची चिंता बिरार-जराड यांना लागून आहे. मात्र, त्यांनी त्यांची काळजी वाहायला सुरुवात केली आहे.